आम्ही लढणारे आहोत पाठ दाखवून पळणारे नाही- मनपा आयुक्त जी. श्रीकांत

आम्ही लढणारे आहोत पाठ दाखवून पळणारे नाही- प्रशासक
प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम...
प्रशासनाच्या वतीने योध्यांचा सन्मान...
औरंगाबाद, दि.15(डी-24 न्यूज) आम्ही लढणारे आहोत पाठ दाखवून पळणारे नाही. आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले. ते मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे गॅस दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता शहराला वाचविण्यासाठी योगदान दिलेल्या योध्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
दि.1 फेब्रुवारी 2024 रोजी जालना रोड एन-3 परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय समोर एक गॅस टँकर दुभाजकला धडकून दुर्घटना ग्रस्त झाले होते. या टँकर मधून गॅस गळती सुरू झाली होती. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली
मनपा, पोलीस, आरटीओ, आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी कर्मचारी यांनी या आकस्मित मोठ्या दुर्घटने पासून जीवित व वित्त हानीचे रक्षण करण्याकरिता आपल्या जीवाची बाजी लावली. या वेळी योगदान दिलेल्या योध्दांचा आज सन्मान करण्यात आला.
महानगरपालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून उप आयुक्त (गुन्हे) नितीन बघाटे हे होते. तर यांचे सोबत व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, उप आयुक्त सोमनाथ जाधव, अंकुश पांढरे, नंदा गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले.
यावेळी विशेष सन्मान म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व पोलीस आयुक्त नितीन बघाटे यांना सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पोलीस, अग्निशमन , आर टी ओ,आरोग्य , माजी सैनिक, आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नितीन बघाटे म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कोणत्याही परिस्थितीत आपला आत्म विश्वास दृढ असला पाहिजे या बळावर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.
सर्व सहकार्यांनी आपला जीव धोक्यात घालून असंख्य जीवांचे रक्षण केले आहे तसेच शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याचे आभार सुध्दा त्यांनी यावेळी मानले. फक्त आदेश देऊन नेतृत्व करता येत नाही तर त्या ठिकाणी दृढपणें उभे राहून कोणतीही परिस्थिती हाताळणे त्याला सामोरे जाणे हे खरे नेतृत्व असते असे ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी मा.जी श्रीकांत म्हणाले की,आम्ही पाठ दाखवून पळणारे नाही तर लढणारे आहोत. प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम, सज्ज आहे. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांचे विशेष कौतुक केले. त्या सोबतच आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आर टी ओ, पाणी पुरवठा ,आरोग्य यंत्रणा ,नागरी मित्र पथकाचे कर्मचारी , स्वछता निरीक्षक, वसुली कर्मचारी यांच्या धाडसाचे कौतुक केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने या योध्यांना पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे
असे ते म्हणाले.
What's Your Reaction?






