उद्या शहरात ओवेसींच्या प्रचाराची तोफ धडाडणार, नाराज नेत्यांना परत आणण्यासाठी यश मिळेल का...?
उद्या शहरात ओवेसींची प्रचाराची तोफ धडाडणार, नाराज नेत्यांना परत आणण्यासाठी यश मिळेल का...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची उद्या सायंकाळी ऐतिहासिक आमखास मैदानावर उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, तिकीट वाटप, प्रभागनिहाय उमेदवारी आणि स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष या कारणांमुळे पक्षातील अनेक जुने कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या जाहीर सभेत नाराजीमुळे मैदान भरेल का...अशीहि चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निवडणुकीत नाराजीमुळे एमआयएम पक्षातील 10 ते 12 जागांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत 24 नगरसेवकांनी विजय मिळवल्याने एमआयएम पक्ष शहरात दुसऱ्या स्थानावर राहिला व विरोधीपक्षनेते पद मिळाले होते. यंदा काय होणार सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत नवीन चेह-यांना संधी देत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न केले जात असून एमआयएमच्यावतीने 50 उमेदवार जाहीर केले होते. यात एका उमेदवाराने माघार घेतली तर एकाचा अर्ज बाद झाल्यामुळे 48 उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे तिकीट वाटप, प्रभागनिहाय उमेदवारी आणि स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष या कारणांमुळे पक्षातील अनेक जुने कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. त्यामुळे शहरात इम्तियाज जलील यांच्याविरोधात एक नाराज गट तयार झाला आहे. यामुळे एमआयएमचा पारंपरिक मतदार विभागला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील निवडणुकांमध्ये संघटित ताकतीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या एमआयएमसमोर यंदा अंतर्गत मतभेद हेच मोठे आव्हान ठरत असल्याचे चित्र आहे. या नाराजी दुर झाली नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचितचा फायदा होईल यामुळे एमआयएम पक्षाच्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे.
विरोधकांना आयती संधी या नाराजीमुळे मिळेल...
एमआयएम पक्षाचे प्रभाग क्रमांक 1,2,3, 6, 7, 12, 13, 14 या प्रभागात वर्चस्व मानले जाते. मात्र, यातील काही प्रभागात इतर स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करत इतर प्रभागातील व्यक्तींनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील नाराजी आणि असंतोषाचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच वंचित बहुजन आघाडीला होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी नाराज पदाधिकारी पक्षाच्या प्रचाराला जाताना दिसत नाहीत. काही माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे तिकीट घेतले तर काही अपक्ष मैदानात आहे यामुळे मतविभाजनाचा फटका एमआयएमच्या उमेदवारांना बसू शकतो. यासाठी ओवेसींनी नाराज असलेल्या नेत्यांची नाराजी दूर करावी असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. यासाठी ओवेसींचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
ओवेसींचा दौरा डॅमेज कंट्रोल’साठी...?
बुधवारपासून ओवेसी प्रचार सुरू करणार आहेत. त्यांचा हा दौरा केवळ प्रचारापुरता नसून, पक्षातील नाराजी कमी करण्यासाठी व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. बंदिस्त बैठका, स्थानिक नेत्यांशी चर्चा आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
What's Your Reaction?