ऐतेहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर

 0
ऐतेहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर

“भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” द्वारे पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर विभागाचा आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत 9 जून 2025 पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी श्री गुरूराज सोना यांच्यासह बैठकस्थळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे देविदास टेकाळे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले, 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' च्या या पाच दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून या यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी चांगली तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरटीसीटीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. पाच दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे. 

यावेळी रेल्वेसह निवासी उपजिल्हाधिकारी, महानगरपालिका तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow