औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने दंड थोपटले...!
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने दंड थोपटले...
विभागीय आढावा बैठकीत निवडणूक लढण्याचा निर्धार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- आगामी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसने दंड थोपटले आहेत. काल गुरूवारी झालेल्या बैठकीत पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत हि निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार करण्यात आला.
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आज छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे येणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 संदर्भात काँग्रेस पक्षाच्या तयारीस गती देण्यासाठी मराठवाड्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी व प्रमुख नेते यांची आज महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नियोजनाखाली व निरीक्षक माजी मंत्री अनिस अहमद व खा.डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सिल्वर इन येथे पार पडली.
बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, मतदार नोंदणी मोहीम, पदवीधरांशी संवाद, संघटन मजबूत करणे आणि बूथ स्तरावर पक्षाची पकड वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पदवीधर मतदारसंघ हा विचारांचा, धोरणांचा आणि विकासाच्या प्रश्नांचा मंच आहे. शिक्षित मतदार वर्गाशी थेट संवाद साधून काँग्रेस पक्षाचे विचार आणि विकासदृष्टी पोहोचविण्याचे हे अभियान असेल.
बैठकीत काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांबाबतही प्राथमिक चर्चा झाली असून पुढील काही आठवड्यांत मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यकर्त्यांना आगामी काळात पदवीधर नोंदणीसाठी जनसंपर्क मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. पक्षाच्या डिजिटल टीमनेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे सुचविले.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने ठरविले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकविण्यासाठी संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जातील.
यावेळी पक्ष निरीक्षक अनिस अहमद, खा.डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, अनिल पटेल, एम. एम. शेख, कमाल फारुकी, विलास औताडे, मोहन देशमुख, तुकाराम रेंगे पाटील, राजेंद्र राख, संदीप ढवळे पाटील, अशोक डोळस, रवींद्र काळे, सय्यद अक्रम, राजाभाऊ देशमुख, राहुल सोनवणे, किरण जाधव, अतिकूर रहमान, मुजाहिद खान, यशपाल भिंगे, राजेश पावडे, बाळासाहेब देशमुख आदी मराठवाड्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष व प्रमुख प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महेश देशमुख यांची समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, सूत्रसंचालन मनपा गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी तर आभार शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी मानले.
What's Your Reaction?