म्हाडाची 1418 निवासी सदनिका व भुखंडांच्या सोडती द्वारे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी...

म्हाडा छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळातर्फे 1418 निवासी सदनिका व भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीचा 'गो-लाइव्ह' समारंभ
मुंबई, दि.30(डि-24 न्यूज) म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हा, बीड व नाशिक शहरामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1 हजार 418 निवासी सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा 'गो लाईव्ह' शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आला.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य अभियंता श्री. धीरजकुमार पंदिरकर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. शिवकुमार आवळकंठे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1 हजार 148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 164 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 39 सदनिका/भूखंडांचा समावेश आहे. तसेच नाशिक मंडळातील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 63 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 4 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 1148 सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता 266 सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता 4 सदनिकांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजी नगर व नाशिक मंडळाच्या संगणकीय सोडतीसाठी एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपवर सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी 12 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेण्याकरिता दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. दि.12 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी दिनांक दि.18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 12 वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.
सोडतीत सहभागी होण्यासाठी IHLMS 2.0 या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तसेच सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 हे मोबाइल ऍप स्वरुपात देखील उपलब्ध आहे. अर्जदार अँड्रॉइड (android) फोन मध्ये प्ले स्टोअर आणि आयओएस (ios) प्रणालीच्या अॅप स्टोर मधून म्हाडा लॉटरी ऍप डाउनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. शिवकुमार आवळकंठे यांनी केले आहे.
मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. आवळकंठे यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही. हक्काचे घर घेऊ इच्छिनार्या अर्जदारांना ही सुवर्णसंधी असून अधिकाधिक नागरिकांनी या सोडतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. आवळकंठे यांनी केले आहे.
What's Your Reaction?






