शासन निर्णयानंतर मार्टीच्या कामांना वेग, कृती समितीने मानले आभार...
शासन निर्णयानंतर मार्टीच्या कामांना वेग...
मार्टी कृती समितीने मानले शासनाचे आभार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)-अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI) ला अखेर आर्थिक मान्यता मिळाली असून, शासन निर्णय (GR) जारी झाल्यानंतर संस्था आता आपल्या योजनांची अंमलबजावणी सुरू करू शकणार आहे. याबद्दल मार्टी कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष एड अजहर पठाण यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
मार्टीची स्थापना ऑगस्ट 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली होती. संस्थेच्या मुख्यालयासाठी आणि विविध उपक्रमांसाठी एकूण 6.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून नवीन पदांची निर्मिती, कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, अभ्यास, प्रशिक्षण इत्यादींसाठी खर्च केला जाणार आहे.
मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे आणि स्वतंत्र खाते उघडण्यात झालेल्या प्रशासकीय अडचणींमुळे संस्थेचे काम वर्षभर ठप्प झाले होते. आता शासन निर्णय जारी झाल्याने ‘अल्पसंख्याक कल्याण’, ‘प्रशासन व दिशा’, तसेच ‘सामाजिक व सामुदायिक सेवा’ या खात्यांसाठी स्वतंत्र खाते उघडण्यास मंजुरी मिळाली आहे.
ही संस्था राज्यातील मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू, शीख आणि पारशी अशा सर्व अल्पसंख्याक समाजांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणार आहे. तसेच या समाजांच्या समस्यांवर संशोधन करून त्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त योजना तयार करणार आहे.
मार्टी कृती समितीचे प्रमुख अॅड. अझहर यांनी सांगितले की, “संस्थेच्या स्थापनेनंतर संपूर्ण वर्षभर निधीअभावी कोणतेही काम सुरू करता आले नाही. आता 6.25 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीनंतर मार्टीचे उपक्रम सुरू होतील. तसेच संस्थेला आणखी 500 कोटी रुपये निधी देण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
What's Your Reaction?