काँग्रेस ओबीसींचे आरक्षण मुस्लिम समाजाला देणार, मुस्लिमांचे लांगुलचालन करत असल्याचा मंत्री अतुल सावेंचा आरोप
ओबीसी,एससी,एसटी आरक्षण रद्द करणार नाही याची हमी काँग्रेसने द्यावी :- मंत्री अतुल सावे यांचे आव्हान
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज ) एससी, एसटी आणि ओबीसींचा आरक्षणाचा हक्क हिरावून ते आरक्षण अल्पसंख्यांकांच्या घशात घालण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे य़ांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, बापू घडामोडे, अनिल मकरीये, दीपक ढाकणे, अरुण गुदगे यांची उपस्थिती होती.
काँग्रेसचे हे कुटील कारस्थान भारतीय जनता पार्टी ने उघड केल्यानंतर अद्याप कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे ,सोनिया गांधी, राहुल गांधी ,प्रियांका गांधी यांसारख्या प्रमुख नेत्यांनी स्पष्टीकरण का दिले नाही ? धार्मिक आरक्षण देणार नाही अशी लेखी हमी काँग्रेस देणार का ? काँग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसी आरक्षण मुस्लिमांना का दिले असा सवालही देखील भाजप चे मंत्री श्री अतुल सावे यांनी केला.
2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत मंत्री श्री अतुल सावे यांनी कॉंग्रेस आणि इंडी आघाडीचा खरा चेहरा उघड केला. यावेळी मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याक मुस्लीमांचा असायला हवा आणि त्यासाठी योजना आखाव्या लागतील असे म्हटले होते. त्याचाच पुनरुच्चार डॉ.मनमोहन सिंग यांनी एप्रिल २००९ मध्ये केला होता. कॉंग्रेस नेहमीच मुस्लीम अनुनयाचे राजकारण करते, हेच यातून दिसून येते. सच्चर समितीचा हवाला देत कॉंग्रेसने देशातील मुस्लीमांची स्थिती दलितांपेक्षा अधिक हलाखीची आहे असे चुकीचे चित्र रंगवून वोट बँकेसाठी मुस्लीमांना झुकते माप दिले हा इतिहास सर्वश्रूत आहे असेही मंत्री सावे यांनी नमूद केले.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धार्मिक आरक्षणाला विरोध असताना कॉंग्रेसने त्यांच्या विचारांचा मान कधीच राखला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतरत्न म्हणून गौरव केला नाही. डॉ. आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न कॉंग्रेसने केले आहेत असेही मंत्री सावे म्हणाले.
सत्ता मिळाल्यानंतर कलम 370 लागू करण्याचे आश्वासन देणा-या कॉंग्रेसला 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरमधील अनुसूचित समाजाची झालेली उन्नती नको आहे, त्यात खोडा घालण्यासाठीच कलम 370 लागू करायचे आहे, असेही ते म्हणाले.
इतिहासातील आणि वर्तमानातील कॉंग्रेसच्या कृतीतून कॉंग्रेसचा मुस्लीमधार्जिणा चेहरा सर्वांसमोर आला आहे. कॉंग्रेसने राष्ट्रीय धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे गठन करण्याची खेळी हे त्यातीलच एक उदाहरण असल्याचे भाजप मंत्री सावे म्हणाले.
ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणातील 6 टक्के आरक्षण काढून घेऊन ते मुस्लीमांना देता यावे ही देखील चाल कॉंग्रेसचीच होती. 1981 मध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हटवण्यासाठी 'एएमयू सुधारणा कायदा' कॉंग्रेसने आणला. 2009 च्या जाहीरनाम्यात नोक-या आणि शिक्षणात मुस्लीमांना राष्ट्रीय स्तरावर आरक्षण देण्याचे वचन देण्यात आले होते. ओबीसी आरक्षणामध्येच मुस्लीमांसाठी उप कोटा असावा अशी कॉंग्रेसची सुप्त इच्छा होती . कर्नाटकात देखील रातोरात मुस्लिमांना ओबीसी बनवून अनुसूचित समाजासाठीचे आरक्षण मुस्लीमांना देण्याचे षडयंत्र कॉंग्रेसचे होते आणि देशभरात हेच मॉडेल राबवायची काँग्रेस ची योजना आहे असे नमूद करत राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी काँग्रेसच्या मुस्लीम लांगूलचालनाच्या घटनांची यादीच सादर केली.
पुढे बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, कॉंग्रेस आणि इंडीने खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
कॉंग्रेस आणि इंडी आघाडी धार्मिक आरक्षण देणार नाही अशी लेखी हमी देणार का ?
कॉंग्रेसने अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी आणि जामिया मिलिया इस्लामिया सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये एससी,एसटी,ओबीसी आरक्षण संपुष्टात का आणले ?
अनुसूचित समाजाच्या अधिकारांचे हनन होऊ नये म्हणून जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्यास कॉंग्रेसचे समर्थन नाही अशी लिखीत हमी देणार का ?
कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मुस्लीमांना का दिले ?
वोट बँकेच्या राजकारणामुळे धार्मिक आरक्षण देण्याच्या सुप्त अजेंड्यावर कॉंग्रेस खेळी करत आहे का ?
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आखून दिलेली आरक्षणाची मर्यादा संपुष्टात आणून कॉंग्रेस वाढीव आरक्षण कुणाला देऊ पाहत आहे ?
कॉंग्रेसने ओबीसी आयोगाला सांविधानिक दर्जा का दिला नाही ?
अनुसूचीत समाजाची संपत्ती हडपून कॉंग्रेसला ती अल्पसंख्यांकांना द्यायची आहे का ?
असे विविध प्रश्नाची उत्तर राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी काँग्रेसला विचारत त्यांना या प्रश्नांची उत्तर देण्याचे आवाहन दिले आहे.
What's Your Reaction?