कार्यवाईच्या विरोधात शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

 0
कार्यवाईच्या विरोधात शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

कारवाईच्या विरोधात शेतकऱ्याचा आत्महदनाचा प्रयत्न केल्याने खळबळ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.5(डि-24 न्यूज) अपर तहसीलदार यांनी कारवाई करत दहा वाहने पकडल्याच्या विरोधात देवळाई भागातील शेतकऱ्याने स्वत:च्या अंगावर केरोसीन टाकून आत्महदनाचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. मोहमद इसाक गुलाब पटेल (रा. लतिफनगर देवळाई) असे या शेतकऱ्याचे नाव असून पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन आत्महदनापासून परावृत्त केले.

देवळाई परिसरातील गट क्र. 71 मध्ये सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी अपर तहसीलदार नितीन गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. तहसीलदारांनी घटनास्थळावरून 6 हायवा आणि चार जेसीबी, पोकलेन जप्त केले होते. ही सर्व वाहने तहसील कार्यालय परिसरात आणून लावण्यात आली आहेत. या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शेतकरी मोहंमद इसाक गुलाब पटेल यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महदनाचा प्रयत्न केला. पटेल हे केरोसीनची कॅन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले. त्यांनी प्रशासनाचा निषेध करीत अंगावर रॉकेल ओतून घेतले. या भागात असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्यांच्या हातातील केरोसीनची कॅन व माचिस हिसकावून घेतली. तसेच आत्मदहनापासून परावृत्त केले. त्यानंतर चिकलठाणा पोलिसांना बोलावून पटेल यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान मोहंमद इसाक पटेल यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपर तहसील कार्यालयाकडून जमीन सपाटीकरणासाठी 3 नोव्हेंबर 2023 मध्ये रितसर परवानगी घेतलेली होती. परंतु तहसील कार्यालयाने आदेशावर तारीखच टाकली नव्हती. त्यानंतर 6 ऑगस्ट 2024 रोजी सपाटीकरणाबाबत परवानगी घेतली होती. त्यानंतरही अपर तहसीलदार यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सपाटीकरणासाठी ही वाहने भाड्याने आणण्यात आली होती. मात्र आता कारवाई करीत ती तहसील कार्यालयात लावल्याने वाहन मालकांकडून पैशासाठी आणि वाहने सोडविण्यासाठी तगादा सुरू आहे. आपल्याकडे कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने आत्महदहन करण्याचा इशारा दिला होता. आपल्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची असून वाहने तात्काळ सोडवावीत अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow