गरजू विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे - मकरंद अनासपुरे

 0
गरजू विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे - मकरंद अनासपुरे

गरजू विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे - मकरंद अनासपुरे

मराठा हायुस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा

मेळावा उत्साहात, विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हसू फुलवले, मेळावा घेण्यासाठी डॉ. कल्याण काळे यांचा पुढाकार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- आपल्या आयुष्यात शाळेचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरू म्हणजे शिक्षक आपल्या आयुष्यातील अंधार दूर करतात. शाळेत चांगले शिक्षक मिळणे ही उत्तम आयुष्याची नांदी असते, समाजात गरजू होतकरू विद्यार्थी आहेत, शेतकरी संकटात आहे व मराठा हायस्कूलची इमारत जीर्ण झाली आहे मदत करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे मत विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी शनिवारी, 8 नोव्हेंबर रोजी येथे व्यक्त केले.

मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणजे अनासपुरे बोलत होते. 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, विश्वस्त अमर शिसोदे, शाळेचे माजी विद्यार्थी, मेळावा संयोजन समितीचे सदस्य खासदार डॉ. कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, प्रेमलता पाटील, एल. के. एखंडे, मुरलीधर पैठणे, डॉ. सुधाकर शेळके, माधवराव थोटे, कलावती सराईकर, विठ्ठलराव लहाने, गणेश वडकर, जब्बार पठाण, रऊफ पठाण, राम टकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बालपणीचे खेळ हरवले

अनासपुरे म्हणाले, आपल्या पिढीने जगलेले बालपण, बालपणीचे खेळ आज हरवले आहेत. आपल्या गमती-जमती आपल्यासोबत जाणार, कदाचित हा आनंद घेणारी आपण मंडळी अखेरची असू. आगाऊ आणि उद्धट विद्यार्थ्यांची व्याख्या आपल्या खास विनोदी शैलीत मकरंद अनासपुरेंनी सादर करताच एकच हशा पिकला. शाळेतील शिक्षकांचे ऋण कधीच न फिटणारे असते. आजच्या मेळाव्यानिमित्त तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आला आहात, हे पाहून विशेष आनंद वाटला. आज आपण पाहतो की आगतिकता वाढली आहे. संवाद व संवेदनांमधील 'सं' हरवून जिकडे-तिकडे वाद आणि वेदना दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी कायम एकत्र रहाण्याचा सल्ला अनासपुरे यांनी दिला. अक्षय शिसोदे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

शिक्षकांचा सत्कार

प्रारंभी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी मेळाव्यामागील संकल्पना स्पष्ट केली. त्यानंतर शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब पठाडे यांनी आभार मानले. मेळाव्याला 1955 च्या बॅचपासूनचे माजी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow