घरफोडी करणा-या आरोपिच्या ग्रामिण पोलिसांनी आवळल्या मुसक्या...

सराईत घरफोड्या जेरबंद : 4 घरफोड्यांचे गुन्हे उघड! ग्रामिण पोलिस स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही...
संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) :- बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारास जेरबंद केले. या आरोपीकडून तब्बल 4 घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामिण पोलिसांनी वर्तवली आहे.
तक्रारदार विश्वनाथ नरवडे (वय 78, रा. बाभुळगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, 17 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांच्या घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा 4 लाख 19 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद बिडकीन पोलिसांत झाली होती.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपीबाबत धागेदोरे मिळाले. अखेर शेकु नेह-या काळे (वय 34, रा. इनामदार वस्ती, बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यास निलजगाव रोड, बिडकीन येथील देशी दारू दुकानासमोरून पोलिसांनी शिताफीने पकडले.
चौकशीत आरोपीने पैठण शहर, नायगाव व बिडकीन परिसरात चार घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास बिडकीन पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या पथकाने केली. या पथकात उपनिरीक्षक दिपक पारथे, अंमलदार श्रीमंत भालेराव, कासिम शेख, सचिन राठोड, बलबिरसिंग बहुरे, शिवाजी मगर आदींचा समावेश होता.
"पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे सराईत घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे."
What's Your Reaction?






