जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित...!

जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज):- जागतिक महिला दिनी (दि.8) जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी रेशमा चिमंद्रे, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे तसेच समुपदेशन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय महिला आयोगामार्फत महिलांचे सक्षमीकरण व सस्नेही कुटुंब या साठी जिल्ह्यात येत्या 8 मार्च पासून विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर हे केंद्र स्थापण्यात आले आहे. जिल्हा संरक्षण अधिकारी श्रीमती वर्षा शेळके, संरक्षण अधिकारी हर्षल पाटील, समुपदेशक विशाल पाईकराव, समुपदेशक गीता अंभोरे, वन स्टॉप सेंटर केंद्र प्रशासक जया शिरसाठ तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या केंद्रामुळे विवाह व विवाहपश्चात होणारे वाद, त्यातुन निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न हे वेळीच सोडविता येतील. यामुळे कुटुंब विभक्त होण्यापासून वाचविण्यात मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी व्यक्त केली.
विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कशासाठी...?
विवाहाशी निगडीत समस्या, त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या, महिलांशी संबंधित हिंसाचार, घटस्फोट रोखण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उपयुक्त व महत्त्वाचे ठरु शकतात. प्रत्येक जिल्हात असे केंद्र सुरु करण्यात येत आहे. विवाहाच्या अल्प कालावधीतच वाढत जाणारे कौटुंबिक वाद, त्यामुळे होणारे घटस्फोट टाळण्यासाठी विवाहानंतर उद्भवणाऱ्या विविध शारीरिक मानसिक, कौटुंबिक समस्यांबाबत माहिती व्हावी. त्याची पूर्वकल्पना विवाहयोग्य दाम्पत्यास व्हावी. त्याबाबत त्यांचे समुपदेशन व्हावे. शिवाय परस्परांबाबत माहिती होणे, परस्परांच्या नोकरीचे स्वरुप, त्यामुळे होणारे संभाव्य ताणतणाव इ. बाबत पूर्वकल्पना देतांनाच या निर्माण होऊ घातलेल्या समस्यांचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत या समुपदेशनात विवाहयोग्य वधुवरांना माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षित समुपदेशक करणार समुपदेशन...
या केंद्रात विवाहपूर्व समुपदेशनासाठी जोडप्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक नेमले जाणार आहेत. या समुपदेशकांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात एका पुरुष व महिला अधिकाऱ्याचे समुपदेशनासाठी प्रशिक्षण झाले आहे. हे अधिकारी वेळापत्रक जाहीर करुन या केंद्रात उपलब्ध असतील.
What's Your Reaction?






