जिल्ह्यात 412 गाव, 61 वाड्यात पाण्याची टंचाई, टँकरने पाणीपुरवठा

 0
जिल्ह्यात 412 गाव, 61 वाड्यात पाण्याची टंचाई, टँकरने पाणीपुरवठा

‘गाव भेटी’द्वारे टंचाई निवारण उपाययोजना करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जून अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) जिल्ह्यात टंचाई स्थितीचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. तरी देखील उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांना येत्या दोन दिवसांत भेटी देऊन उपाययोजना कराव्या. पाणी पुरवठ्यासाठी जून महिनाअखेर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिले.

दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक...

 जिल्ह्यातील टंचाई निवारण उपाययोजनांचा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. पी. झोड, भूजल सर्व्हेक्षणचे जीवन बेडवाल, कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी तसेच उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

४१२ गावे, ६१ वाड्यांमध्ये ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा...

 जिल्ह्यात सध्या ४१२ गावे व ६१ वाड्यांमध्ये टंचाई स्थिती असून तेथे टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. सद्यस्थितीत ६७८ टॅंकर्स द्वारे पाणी पुरवठा होत आहे. या शिवाय २८५ गावांमधील ३४६ विहिरींचे अधिग्रहण करुन लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जात आहेत. 

चारा उपलब्धतेचे नियोजन...

शिवाय पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच पशुधनासाठी जेथे चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे ती माहिती गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचवावी. येत्या हंगामात चारा पिके घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी स्थानिक पशुवैद्यक दवाखान्यास भेट देऊन चारा पिकाच्या बियाण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.

टॅंकर्सना जीपीएस लावा- विकास मीना...

 मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सांगितले की, टॅंकर भरण्याची ठिकाणे वाढविण्यात यावे. तसेच टॅंकर्सना जीपीएस लावून त्यांच्या फेऱ्या तपासाव्या. त्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करावा. जिल्ह्यात तलाव व धरणातील गाळ काढण्याच्या कामांना गती द्यावी. 

नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा- जिल्हाधिकारी स्वामी...

 जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, सर्व तालुका व उपविभागीय अधिकाऱ्यांनी जेथे टॅंकर सुरु आहे त्या गावांना प्रत्यक्ष भेटी द्याव्या. येत्या दोन दिवसांत या भेटी पूर्ण कराव्या. या भेटींमध्ये अधिकाऱ्यांनी पाण्याचे स्रोत, पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता, टॅंकरच्या फेऱ्यांच्या नोंदी, फेऱ्यांचे प्रमाणिकरण नोंदी, टॅंकर भरण्यासाठी उपलब्ध होऊ शकणारे नजिकचे ठिकाण याची प्रत्यक्ष पाहणी करावी व गावकऱ्यांशी भेट घेऊन चर्चा करावी. पाणी पुरवठ्याचे नियोजन जून अखेरपर्यंत करावे,असे निर्देश त्यांनी दिले तसेच काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी अकस्मिक भेटी देऊन पाहणी करावी,असेही त्यांनी सांगितले. टॅंकर फेऱ्या तपासण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow