जिल्ह्यातील 303 जणांना नियुक्तीपत्र, सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी - पालकमंत्री संजय शिरसाट
 
                                जिल्ह्यातील 303 जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान...
सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4 (डि-24 न्यूज)- अनुकंपा तत्वारील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील 303 उमेदवारांना आज समारंभपूर्वक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राज्यभरात आज एकाच दिवशी 10 हजार 309 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मुंबई येथे मुख्यसमारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. हा सोहळा या कार्यक्रमात दुरदृष्यप्रणालीने दाखवण्यात आला.
आपल्याला मिळालेली सरकारी नोकरी ही जनतेच्या सेवेची संधी आहे, अशा शब्दात पालकमंत्री शिरसाट यांनी नवनियुक्त उमेदवारांना संबोधित केले.
जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम आज संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, आ. अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे तसेच अन्य प्रशासकीय विभागप्रमुख उपस्थित होते.
नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधतांना पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, शासनाने अवलंबिलेल्या नव्या कार्यपद्धती व नियमांमध्ये सुधारणा केल्याने आज अनेकांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यासाठी शासनाने अनेक वर्ष प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे निकाली काढली. इतक्या उमेदवारांना नियुक्तीपत्र माझ्या हस्ते प्रदान केले जात आहेत, हा माझ्या आयुष्यातील मोठा क्षण आहे. प्रत्येक नोकरीधारकावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. अनुकंपा तत्त्वावर ज्यांना नियुक्ती मिळाली आहे, त्यांनी आपले कुटुंब, आपल्यावर अवलंबून असणारे यांची काळजी घ्यावी. नोकरी प्राप्त केल्यानंतर परिश्रम आणि अभ्यास करुन आपल्या पदाचा आलेख उंचावत ठेवा. शासकीय नोकरी ही जनतेची सेवा करण्याची संधी आहे. आपल्याकडे आलेल्या माणसांचे काम करुन द्यावे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही सगळ्यात मोठा असतो.
आ. अनुराधा चव्हाण ह्यांनीही नवनियुक्त उमेदवारांचे शासकीय सेवेत स्वागत केले. आपली नोकरी करुन जनतेच्या सेवेचे समाधान प्राप्त करावे,असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. सुत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.
 
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            