निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म निरीक्षकांची भुमिका महत्वाची - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
 
                                निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक होण्यासाठी
सुक्ष्म निरीक्षकांची भुमिका महत्त्वाची -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) प्रत्येक मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांमार्फत निवडणूक प्रक्रियेचे अवलोकन करण्यात येणार आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर अवलोकन करुन निवडणूक निरीक्षकांना वेळेत अहवाल सादर करावा. निवडणूक प्रक्रिया निर्दोष, निष्पक्ष आणि पारदर्शक पार पाडण्यात सुक्ष्म निरीक्षकांची भुमिका महत्त्वाची असते, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सुक्ष्म निरीक्षकांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे. प्रशिक्षण समन्वयक तथा नोडल अधिकारी अभिराम डबिर यांच्यासह बँक आणि एलआयसी कार्यालयातील नियुक्त अधिकारी तथा सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.
१९ औरंगाबाद या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती केली असून त्यांनी करावयाच्या कामकाजाचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, सुक्ष्म निरीक्षकांनी खर्च, कायदा सुव्यवस्था, सामान्य आणि मतदान याबाबत निरीक्षकांना वेळेत अहवाल विहित नमुन्यात सादर करावा. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून संपेपर्यंत विविध गोष्टींचे अवलोकन करून मतदान केंद्रावरील एजंट, व्हीव्हीपॅट मशीन, वोटर स्लिप, कंट्रोल युनिट, कायदा सुव्यवस्था व इतर अनुषंगिक गोष्टींचे अवलोकन करून तसा अहवाल नमुना एल मध्ये वेळेत सादर करावा. संवेदनशील मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची जबाबदारी अधिक असते. प्रदत्त मतपत्रिका देण्याबाबतची कार्यवाही वेळेत करावी. पोस्टल मतदार यादी,निवडणुकीत नियुक्त कर्मचाऱ्यांचे मतदान, ज्येष्ठ, वयोवृद्ध व्यक्तींचे मतदान, प्रदत्त मतदान याबाबतचाही अहवाल सादर करणे अपेक्षित असते. निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या कार्यपद्धतीचे अभ्यास करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            