जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कार्यवाई करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

“विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांना आढावा बैठकीत सायबर सुरक्षा, इ -बिट व NATGRID प्रणालीचा प्रभावी वापर आणि सणोत्सव बंदोबस्तावर विशेष भर देण्याचे निर्देश. ....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) -
सनोत्सव जवळ असल्याने बंदोबस्ताबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी आढावा बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा अधिकारी आणि जिल्ह्यातील 24 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत ई-बिट प्रणाली प्रभावीपणे राबविणे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचे E-BIT क्रमांक सविस्तर नोंदविणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले. तसेच NATGRID प्रणाली वापरण्याचे बाबत प्रभारी अधिकारी यांना माहिती देऊन कारवाई करणे हा पोलिसिंगचा महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे हद्दीत 100% गावभेटी पूर्ण कराव्यात, गावांमध्ये गोपनीय बातमीदार तयार करावेत, तसेच विना तामिल वॉरंट बाबत नियमित आढावा घेऊन वॉरंट तामिल करण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.
तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात 90 दिवसांच्या आत दाखल करणे अनिवार्य असल्याचेही स्पष्ट केले. गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना तपास अधिकारी यांचे निष्काळजीपणामुळे जामिन मिळाल्यास अशा अधिकारी यांच्यावर खातेनिहाय कारवाई करण्याचे इशारा सुद्धा त्यांनी दिला.
बैठकीत सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, नागरिकांसाठी डिजिटल सुरक्षा जागरूकता मोहिम राबविणे आणि शाळा व महाविद्यालयांमध्ये नव्या सायबर कायद्यांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले.
नव्याने लागू झालेल्या फौजदारी कायद्यांबाबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देऊन प्रलंबित गुन्ह्यांचे जलद निवारण आणि न्यायालयीन प्रक्रियेत काटेकोरता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यावर जोर देण्यात आला. दारूबंदी, जुगार, आर्म्स अॅक्ट, एन.डी.पी.एस., वाळू चोरी तसेच पिटा यासारख्या प्रकरणांमध्ये सशक्त कारवाई करणे, आरोपींना तातडीने अटक करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले. प्रलंबित गुन्हे, फरार आरोपी, समन्स व वॉरंट निर्गतीकरण यावर त्वरित कारवाई करण्याचे तसेच कन्व्हिक्शन रेट वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला मुद्देमाल तातडीने तपासून ताब्यात घेऊन तो फिर्यादींना परत देण्यावरही जोर देण्यात आला.
सणोत्सवाच्या काळात सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी दुर्गादेवी मंडळांची अद्यावत माहिती ठेवणे, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून अडथळे दूर करणे तसेच गर्दी नियंत्रणासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्ताची तयारी करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले गेले. पूरजन्य परिस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफसोबत समन्वय साधून आकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पथकांचे नियमित सराव घेण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बैठकीत स्पष्ट केले की, प्रत्येक ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेणे, प्रामाणिक आणि जलद कायदेशीर कारवाई करणे, तसेच सण-उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा पोलिस दलाचा मुख्य उद्देश आहे. या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाला सायबर गुन्हे प्रतिबंध, नवीन कायद्यांचे प्रभावी प्रशिक्षण, प्रलंबित प्रकरणांचा वेगवान निपटारा, E-BIT व NATGRID प्रणालींचा योग्य वापर, अवैध व्यवसायांवर कडक कारवाई आणि नागरिक-केंद्रित पोलिसिंग याबाबत मार्गदर्शन केले आहे.
What's Your Reaction?






