जेष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचे निधन, पत्रकारीता क्षेत्रात शोककळा
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचे निधन
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) ज्येष्ठ पत्रकार, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद काशीनाथ माने (वय ६१) यांचे सोमवारी (८ एप्रिल) रात्री दीर्घ आजाराने हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, १० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्यानगर येथील अलंकार हाउसिंग सोसायटी इथून सकाळी अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, बहीण आणि पुतण्या असा परिवार आहे.
क्रीडा, राजकारण, समाजकारण या विषयांवरील बातमीदारीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचे काविळीच्या आजाराने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘दैनिक मराठवाडा’ ते ‘महाराष्ट्र टाइम्स’ अशी मुद्रित माध्यमात त्यांची लक्षवेधी कारकिर्द राहिली. १९८५ मध्ये क्रीडा वार्ताहर म्हणून त्यांनी ‘मराठवाडा’ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली होती. या वृत्तपत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले. त्यांनी ‘सिटी चॅनल’ आणि ‘तारा मराठी’ या दूरचित्रवाहिनीसाठी विभागीय बातमीदार म्हणून काम केले. ‘लोकसत्ता’चे मराठवाडा आवृत्तीप्रमुख म्हणून माने यांनी उल्लेखनीय काम केले. २०११ ते २०२१ पर्यंत त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मराठवाडा आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक पदावर काम केले. मराठवाड्यातील वेगवेगळ्या घटनांवर त्यांनी केलेले प्रासंगिक लेखन विशेष गाजले. ‘मराठवाडी मुलखातून’ या सदरात माने यांनी प्रादेशिक प्रश्नांवर पोटतिडकीने लेखन केले. अफाट जनसंपर्क आणि व्यासंग असलेल्या माने यांनी तब्बल ३२ वर्षे पत्रकारिता केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी डिजिटल पत्रकारितेचा मार्ग निवडला होता. ‘आज दिनांक’ आणि ‘महाराष्ट्र स्पोर्टस’ या ई-पेपरच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील वाचक जोडले होते. प्रसिद्ध क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली माने यांनी क्रीडा पत्रकारितेचे धडे गिरवले होते. मराठवाड्यातील क्रीडा घडामोडीवर लिहितानाच त्यांनी अनेक खेळाडूंना मदत केली होती. त्यांची लेखन शैली वाचकांना भावणारी होती. ते सरस्वती भुवन प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात कार्यरत होते.
----संस्थात्मक कार्यावर भर
बातमीदारीपुरते मर्यादित न राहता प्रमोद माने यांनी संस्थात्मक कार्यावर भर दिला होता. क्रीडा संघटनांना मदत करणे, क्रीडा महोत्सव भरवणे, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात ते आघाडीवर असत. त्यांनी औरंगाबादसह मराठवाड्यातील विविध संस्थांना मदत केली होती. खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक अशी त्यांची ख्याती होती.
What's Your Reaction?