"संवादसेतू" उपक्रमास प्रारंभ...प्रशासन व मतदार यांच्यातील विश्वास वृध्दिंगत करण्यासाठी संवाद सेतू- जिल्हाधिकारी
‘संवादसेतू’ उपक्रमास प्रारंभ....
प्रशासन व मतदार यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ‘संवाद सेतू’
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन...
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन निवडणूक राबवित आहे. निवडणूक प्रक्रियेत केवळ मतदान हे गोपनिय असावं,असे माझे मत आहे. त्यादृष्टीने माध्यमांच्या मदतीने जनतेपर्यंत सर्व माहिती पोहोचावी यासाठी आणि परस्परांवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी संवाद सेतू हा उपक्रम आहे. तो अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज व्यक्त केला.
जिल्हा प्रशासन व माध्यम प्रतिनिधींमध्ये संवाद स्थापित करुन त्याद्वारे जनतेपर्यंत निवडणूक विषयक विविध पैलूंची माहिती पोहोचावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘संवाद सेतू’ या उपक्रमास आज सुरुवात करण्यात आली. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी साडेतीन वा. जिल्हाधिकारी स्वतः किंवा जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधतील. हा परस्पर संवाद असेल. ह्यात माध्यमांकडूनही सुचना मागविण्यात येतील. आज समिती सभागृहात या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अर्धवट माहिती मिळणे वा बऱ्याचदा संवाद नसल्याने माहिती न मिळणे ह्या बाबी अयोग्य आहेत. निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबींची माहिती ही मिळायला हवी. त्यासाठी संवादात कोणतीही उणिव राहू न देणे हे महत्त्वाचे असते. या उपक्रमाद्वारे निवडणूक कामकाजातील विविध पैलूंची माहिती दिली जाईल,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, प्रशिक्षण नोडल अधिकारी डॉ. अभिराम डबीर तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
What's Your Reaction?