दिवाळी झाली गोड, मनपाच्या कंत्राटी कामगारांची वेतनवाढ, मनपा आयुक्तांचा सत्कार...
दिवाळी झाली गोड, मनपाच्या कंत्राटी कामगारांची वेतनवाढ, मनपा आयुक्तांचा केला सत्कार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एजन्सींनी किमान वेतन द्यावे असे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिल्यानंतर दिवाळीतील पगारात या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 6 हजार रुपयांची भरघोस वाढ झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
हा निर्णय घेतल्याने यंदाची कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे, यानिमित्त यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांचा सत्कार केला.
कंत्राटी वाहनचालकांना 15 हजारांवरून 21,200 रुपये, मजुरांना 13 हजारांवरून 19,600 रुपये अशी जवळपास 5 ते 6 हजारांची दरमहा वाढ मिळाली आहे. तर मागील दोन महिन्यांचा पगार ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे सर्वांची दिवाळी गोड झाली आहे. त्यामुळे शनिवारी यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी जकात नाका येथील वर्कशॉप येथे मनपा आयुक्तांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, उपअभियंता सचिन वाईकर, कनिष्ठ अभियंता वैभव बोरकर, प्रेषित वाघमारे, राधिका चव्हाण, प्रफुल्ल राठोड, शुभम भुमरे यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सुभाष काने, जयेश नरवडे, नरेश इंगळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्तांनी यांत्रिकी विभागातील परिसराची पाहणी केली. या भागातील मोकळ्या जागेत महापालिकेच्या इतर ठिकाणच्या इमारती आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय या परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या क्वॉर्टरचीही पाहणी आयुक्तांनी केली. यांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीच्या बांधकामालाही लवकरच सुरूवात होईल, असे यावेळी आयुक्तांनी सांगितल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?