दिव्यांगांच्या न्यायासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पिंडदान करत प्रहारने केले आंदोलन

दिव्यांगांच्या न्यायासाठी प्रहारने केले पिंडदान करत केले आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) महापानगरलिका प्रशासन दिव्यांगांचा निधी खर्च करत नाही. दुसऱ्या राज्यात 4000 ते 5000 हजार रुपये प्रतिमहीना मानधन दिले जाते, आपल्या राज्यात फक्त 1500 रुपये दिले जाते. दिव्यांग लाडकी बहिणींचे अर्ज लगेच पात्र ठरवले जातात मात्र दिव्यांग बांधवांचे अर्ज मंजूर करायला वर्षानुवर्षे लागतात. असा कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगून येत्या 21 मार्च 2025 रोजी रायगडाच्या पायथ्याशी उपोषण करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडून यांनी दिली.
दिव्यांग त्र्यंबक धोत्रे या तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शनिवारी शासनाच्या धोरणाविरोधात पिंडदान आंदोलन करण्यात आले. गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान विधी करून शासन धोरणाचा निषेध करण्यात आला. दिव्यांगांच्या योजनांवर उदासिन असणाऱ्या प्रशासनाने बळी घेतलेल्या दिव्यांग मयत त्र्यंबक धोत्रे यांच्या तेराव्यानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात आले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
माजी आ. कडू म्हणाले, या सरकारने दिव्यांगांचे कर्जमुक्त व्हावे, त्याच्यावरील भार मुक्त करावा यासाठी हे पिंडदान केले आहे. 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है'च्या घोषणा दिल्या जात असताना खरच आज राज्यात सगळे सेफ आहेत का ? आज आमचा दिव्यांग बांधव कटला आहे. त्याला जबाबदार कोण आहे...तो पण हिंदू आहे ? फक्त मते घ्यायसाठीच या घोषणा आहेत का ? शासनाच्या धोरणामुळे आमचा दिव्यांग बांधव कटला आहे. दोन लाखांच्या कर्जसाठी दहा लाखांची वसुली कशी करता ? महानगरपालिका प्रशासन दिव्यांगांचा निधी खर्च करत नाही. बाकी राज्यात 4 ते 5 हजार रुपये मानधन दिले जाते, आपल्याकडे तुम्ही फक्त 1500 रुपये दिले जाते. दिव्यांग लाडकी बहिणींचे अर्ज लगेच पात्र ठरवले मात्र दिव्यांग बांधवांचे अर्ज मंजूर करायला वर्ष का लागते ? असा कारभार खपवून घेतला जाणार नाही. प्रजासत्ताक दिनी आम्ही आंदोलन करून याचा निषेध केला होता. आता 21 मार्च रोजी रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ यांच्या समाधीजवळ 5 दिवसांचे उपोषण करणार आहे. रक्तदान करणार आहे. तरीही प्रशासनाने पाऊल उचलले नाही तर मंत्रालयाला घेराव घातला जाईल असा इशारा बच्चू कडून यांनी यावेळी दिला.
आंदोलनासाठी राज्यभरातून दिव्यांग बांधव आले होते. यामध्ये राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्यासह धर्मेंद्र सातव, रामदास खोत, सुधाकर शिंदे, कुणाल राऊत, अनिल पालोदे, चंद्रभान गांगुर्डे, मोहन मुंडे, लक्ष्मी देशमुख, अनिता कदम, रामदास कोळी, पारसचंद साकला, रघुनाथ तोंडे, सुनीता खरात, राजेश जयस्वाल, दादासाहेब पाचपुते, गणेश नलावडे, युसुफ पटेल, रामू खाकरे, सुदाम गायकवाड, दत्ताभाऊ साळकर, युवराज पाटील, मोहिद देशमुख, गोविंदआप्पा डांगे, शांताराम बनकर, धोंडीराम सकुंडे, अशोक रोडे, राधा खरात, नरसिंग ठुबे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्राम पंचायतीच्या पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च व्हावा, मयत धोत्रे यांचे कुटुंबियाला न्याय मिळावा अशी मागणी शिवाजी गाडे यांनी केली.
एक लाखांसह एकाला नोकरीची हमी
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कन्नड तहसीलदार यांच्यावर कडू यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. संबंधित बँकेकडून त्या कर्जाची माहिती घ्या आणि जिल्हा परिषदेच्या पाच टक्के निधीतून संबंधित मयत दिव्यांग बांधवाच्या कुटुंबियाला एक ते सव्वा लाखांची रक्कम देण्याचे सांगितले. दरम्यान, मदतीचा निधी मंजूर झाला असून, सोमवार रोजी तो कुटुंबियाला देण्यात येईल असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच दोन महिन्यात कुटुंबीयांपैकी एका खासगी नोकरीची व्यवस्थाही केली जाईल असे कडू यांनी सांगितले.
What's Your Reaction?






