दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा- डॉ.नीलम गो-हे
शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती मे, जून पर्यंत अधिक तीव्र होत जाणार. या कालावधीत शासनातर्फे दुष्काळी उपाययोजना केल्या जातात याबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. दुष्काळी उपाययोजना राबवितांना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी झेलम जोशी, एच.पी. देशमुख, धनाजी धोतरकर, पुष्कराज तायडे, रमेश कुटे, मारोती बनसोडे, ज्ञानेश्वर हनवते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी माहिती दिली. जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी सद्यस्थितीत 50 महसूल मंडळांत दुष्काळी स्थिती आहे. अशा सर्व भागात दुष्काळी उपाययोजना सुरु आहेत. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळी उपाययोजना जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करणे, शेतकऱ्यांकडून सक्तिची कर्ज वसुली थांबविणे, वीज देयकांची वसूली थांबविणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी. पुढील हंगामापर्यंत (जून पर्यंत) कर्ज वसूली थांबविण्याची प्रक्रिया सुरु करा,असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा. त्याच्या उपलब्धतेबाबतही लोकांना माहिती द्या. त्यावर जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या 9005 कामे सुरु असून 70 हजार मजूर काम करीत आहे. प्रत्येक गावात किमान 5 कामे तरी शेल्फवर असावी,असेही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले असल्याचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, रोजगार हमी योजनेच्या कामांवर येणे शक्य नसलेल्या एकल किंवा विधवा महिलांना मदत दिली जावी. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांची मुलं सांभाळण्यासाठी व्यवस्था (निवारा) करावा,असेही निर्देश त्यांनी दिले.
What's Your Reaction?