"नक्शा"प्रकल्प: कन्नड येथे ड्रोन सर्व्हेक्षणास प्रारंभ...!

‘नक्शा’ प्रकल्पः कन्नड येथे ड्रोन सर्व्हेक्षणास प्रारंभ...
मालमत्तेच्या अधिकृत दस्तऐवजामुळे भवितव्य सुकर- जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करुन अद्यावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा ‘नक्शा’(National geospatial Knowledge based land Survey of urban Habitations: NAKSHA) उपक्रम आज कन्नड येथे सुरु झाला. प्रथदर्शी प्रकल्प म्हणून कन्नड नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या ड्रोन सर्व्हेक्षणाचा प्रारंभ आज कन्नड येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरी भागातील मालमत्तांचे ड्रोन च्या साह्याने मोजणी, दस्तऐवजीकरण होऊन मालमत्ता प्रमाणपत्र मिळेल. भूमी अभिलेख महसूल ,नगरपालिका यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नक्शा’ प्रकल्पामुळे आपले भवितव्य सुकर आणि सुलभ होईल,असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयात ‘नक्शा’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते ड्रोन कार्यान्वित करून शुभारंभ झाला. कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडावकर, उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव, जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख डॉ. विजय वीर, सर्व्हे ऑफ इंडियाचे सुरेंद्र सुतार. कन्नडचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, नगरपालिका मुख्याधिकारी. नागरीक यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ‘नक्शा’ या प्रकल्पासाठी कन्नड शहराची निवड झाली आहे. ड्रोन द्वारे मालमत्ता मोजणी होऊन अचूक सिमांकन होईल. या मोजणीचे प्रमाणपत्र मालमत्ताधारकाला वितरित होणार आहे. हा एक वैध व भक्कम पुरावा असल्याने मालमत्ता, जागेची हद्द यावरुन होणारे वाद संपुष्टात येतील. सर्वच मालमत्तांची मोजणी होणार असल्याने महसूल प्राप्त होईल. महसूल, नगरपालिका आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्या संयुक्त जबाबदारीतून हे कार्य पूर्ण होईल. पथदर्शी प्रकल्पात जिल्ह्याला ही मोठी संधी प्राप्त झाली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांपैकी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये हा पथदर्शी नक्शा उपक्रम राबविण्यात येत असून यात राज्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व विभागाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी ही आपल्या भाषणात या प्रकल्पाचे फायदे समजावून संगितले. प्रास्ताविक तहसिलदार विद्याचरण कडावकर यांनी केले.
ग्रामिण भागातील जमिन मोजणी व मालमत्ता कार्ड तयार करुन देण्यासंदर्भात नुकताच स्वामित्व प्रकल्प राबविण्यात आला. त्याच धर्तीवर शहरी भागातील जमिन मोजणी करुन मालमत्ता कार्ड देण्याबाबत ‘नक्शा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यात 10 नगरपालिका क्षेत्रामध्ये हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड नगरपालिकेचा समावेश आहे. कन्नड नगरपालिकेचे 4.80 चौरस किलोमिटर क्षेत्रातील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण केले जाईल.
What's Your Reaction?






