नगरपालिका क्षेत्रात रस्ते मोजणी करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नगरपालिका क्षेत्रात रस्ते मोजणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.17 (डि-24 न्यूज) - जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्ये अतिक्रमित बांधकामांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक नगरपालिका हद्दीत रस्त्यांची भुमिअभिलेख आणि नगररचना विभागामार्फत संयुक्त मोजणी करुन सीमांकन करुन घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज नगरपालिका प्रशासन शाखेची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, बी.यु. बिघोत, पी.पी. अंभोरे. समीर शेख, कारभारी दिवेकर, ज्ञानेश्वर ठोंबरे, संतोष आगळे, सहा. आयुकत ऋषिकेश भालेराव आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0, नगरपालिकांमधली अनुकंपा पदभरती, विभागीय परीक्षा, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण इ. मुद्यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. त्यानिमित्त वेरुळ येथील घ्रुष्णेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता वेरुळकडे जाणारे रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. तसेच घ्रुष्णेश्वर मंदिर परिसरात रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांची मोजणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्येही संयुक्त मोजणी करुन सीमांकन करुन घ्यावे. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी,असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले.
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी झिरो पेंडसी करावी. नाविन्यपूर्ण जनहिताचे उपक्रम राबवावे, विकसित महाराष्ट्र 2047 ह्या सर्व्हेक्षणात आपल्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढवावा. प्रत्येक नगरपालिकेने नागरिकांसाठी तक्रार निवारण दिवस निश्चित करावा. ई-ऑफिस ला चालना द्यावी. याशिवाय प्रभाग रचना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,असेही निर्देश देण्यात आले.
What's Your Reaction?






