लोकाभिमुख सेवांसाठी प्रशासन आणि माध्यमांचा समन्वय आवश्यक - जितेंद्र पापळकर

 0
लोकाभिमुख सेवांसाठी प्रशासन आणि माध्यमांचा समन्वय आवश्यक - जितेंद्र पापळकर

लोकाभिमुख सेवांसाठी प्रशासन आणि माध्यमांचा समन्वय आवश्यक - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16 (डि-24 न्यूज)- लोकाभिमुख सेवांसाठी प्रसार माध्यमे आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात माहिती जनसंपर्क महासंचालनाच्या छत्रपती संभाजी नगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ.माधव सावरगावे ,महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ.रेखा शेळके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, प्रमुख मार्गदर्शक दीपक रंगारी, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे शेळके, प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांची उपस्थिती होती. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यशाळेचे उदघाट्न नियोजन सभागृहात झाले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की,बदललेल्या काळानुसार बातमीचे स्वरूप ही बदलले आहे. ज्याप्रमाणे वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या बातम्या तसेच समाज माध्यमावर प्रदर्शित होणाऱ्या बातम्या यामधील फरक लक्षात घेता वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये वस्तुस्थिती अधिक प्रमाणात मांडलेली दिसते. ही बाब कोणत्याही विषयाची पार्श्वभूमी समजण्यासाठी साह्यभूत ठरते. पत्रकार प्रशासनातील चुका निदर्शनास आणून देण्याचे काम करतात. बदललेले तंत्रज्ञान शासन लोकाभिमुख करण्यासाठी येणाऱ्या आवश्यक आहे. पत्रकारांनाही कायद्याचे ज्ञान, भाषेचा योग्य वापर या बद्दल ज्ञान आवश्यक आहे. समाजामध्ये सोहर्दपूर्ण वातावरण तयार करून संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि पत्रकारिता यांनी समन्वयाने काम केल्यास समाजाच्या विकासात गतिमानता येईल असेही पापळकर यांनी सांगितले. 

  

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की ,समाजाला आरसा दाखवण्याचे काम पत्रकार करतो. तंत्रज्ञानातील बदल गतिमानता आणि प्रगती यासोबत पत्रकाराने बदलत गेले पाहिजे. स्वतःला सर्व पद्धतीने अद्यावत ठेवण्यासाठी भाषा,शुद्धलेखन व संवाद पत्रकारांनी हाताळले पाहिजे. वाढलेल्या स्पर्धेमध्ये गुणवत्ता टिकवण्याचे हे एक मोठे आव्हान असून स्वतःसाठी ही आचारसंहिता आवश्यक असते. त्याचेपालन पत्रकाराकडून होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान, प्रशासनातील नियम याचे अवलोकन पत्रकाराने करणे आवश्यक आहे. जेणेकरून वस्तुस्थिती मांडण्यामध्ये पत्रकारांना याचे सहाय्य होईल.  

डॉ. माधव सावरगावे यांनी सांगितले की, पत्रकाराने जबाबदारीचे भान ठेवून पत्रकारिता करावी.स्वतः समाज व्यवस्थेतील आरसा म्हणून काम करत असताना प्रशासन व्यवस्था यांच्याविषयीच्याही जाणीव हरपू न देता वस्तुस्थिती आणि सत्य आधारित पत्रकारिता करावी. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यामध्ये वेळोवेळी सहकार्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.    

डॉ.रेखा शेळके म्हणाल्या की,मोबाईलमुळे वस्तुस्थिती विरहित माहितीचे प्रक्षेपण होतांना दिसते. पत्रकारांनी सत्य आधारित वार्तांकन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद दुसाने यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रभू गोरे यांनी केले.

या कार्यशाळेत अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या विषयांवर जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याविषयावर जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे शरद दिवेकर तर वृत्तसंकलन-संपादनात शुद्ध लेखनाचे महत्त्व या विषयावर प्रा. दीपक रंगारी, परभणी यांनी मार्गदर्शन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow