नारेगावाच्या त्या युवकाची आत्महत्या नव्हे खून...!

नारेगावच्या ‘त्या’ युवकाची आत्महत्या नव्हे हत्याच!
पीएम रिपोर्टमधून स्पष्ट, मृतकाच्या नातेवाईकांचा पोलिसांनी नोंदवला जबाब
औरंगाबाद,दि.24 (डि-24 न्यूज) नातेवाइकांनी तरुणाची हत्या करून, त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा आणि त्यानंतर घाईगडबडीत दफनविधी केल्याचा प्रकार कालच समोर आला आहे. या तरुणाने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाल्याची तक्रार युवकाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर 6 दिवसांनी मृतदेह शहरातील गंजेशहीदा कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आला आणि तपासाची चक्रे फिरली.
मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीमध्ये मृतदेहावर 6 ठिकाणी वार असून तरुणाची हत्याच झाल्याचा अहवाल पोस्टमार्टममध्ये समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घनसावंगी पोलिसांनी आज शुक्रवारी मृतकाच्या नातेवाईंकांचा नारेगावमध्ये जबाब घेतला. अशी माहिती तरुणाचे काका महंमद बिन हिलाबी यांनी डि-24 न्यूजशी बोलताना दिली.
सालेह फरहान हिलाबी उर्फ शहजाद,वय 19, राहणार नारेगाव, औरंगाबाद असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील फरहान सालेह हिलाबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेह मावशीच्या गावाला म्हणजे घनसावंगी येथील देवनगर येथे गेला होता. तेथे 4 दिवस राहिल्यानंतर, वासेद याफई या नातेवाइकाने 17 नोव्हेंबर रोजी त्यांना फोन केला आणि सालेहने आत्महत्या केल्याचे सांगितले. या फोनमुळे फरहान यांना धक्का बसला. त्यानंतर आनस मोईद याफई, सालेह मोईद याफई, मोईद याफई यांनी शहजाद याचे पार्थिव नारेगावपर्यंत आणले. आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगून या नातेवाइकांनी गडबड केली आणि पहाटे चार वाजेपर्यंत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दोन दिवसांनी फरहान यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करून, गुरुवारी गंजेशहिदा कब्रस्तान येथे दफन केलेला मृतदेह कबरीतून बाहेर काढला. मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेच्यावेळी तहसीलदार, घनसावंगीचे पोलिस, न्यायवैद्यक विभागाचे पथक; तसेच जीन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी घाटी रुग्णालयात नेले. या ठिकाणी अहवालात मृत युवकावर 6 वार झाल्याची माहिती समोर आली आहे. आज 24 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी मृतकाच्या नातेवाईकांचे पोलिसांनी नारेगावात जबाब घेतले. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
What's Your Reaction?






