पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 10 टक्के रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ...!
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना अंतिम मुदतीपूर्वी रक्कम भरण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या वाटप प्रक्रियेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकेच्या एकूण किंमतीपैकी 10 टक्के रक्कम भरण्यासाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. या बाबत आयुक्त श्री अमोल येडगे यांनी काल दि.8 जून रोजी त्यांचे दालनात आढावा बैठक घेतली होती.
महानगरपालिकेतर्फे यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना (AHP) अंतर्गत विविध प्रकल्पांतील एकूण 11,120 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. स्वतःचे पक्के घर नसलेले तसेच वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
सुंदरवाडी, पडेगाव, हर्सूल आणि तिसगाव येथील गृहप्रकल्पांमधील पात्र लाभार्थ्यांची निवड 30 मार्च 2026 रोजी सोडत प्रक्रियेद्वारे करण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांना सदनिकेच्या एकूण किंमतीपैकी 10 टक्के रक्कम भरण्याबाबत टपालाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. या रकमेच्या भरण्यासाठी 6 जून 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
तथापि, अनेक लाभार्थ्यांकडून अद्यापही 10 टक्के रक्कम जमा करण्यात आलेली नसल्याने महानगरपालिकेने अंतिम मुदत 18 जून 2026 पर्यंत वाढविली आहे. या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक रक्कम जमा करणे बंधनकारक असून, मुदतीत रक्कम न भरल्यास त्यांना वाटप करण्यात आलेल्या सदनिकेवरील हक्क रद्द करण्यात येणार आहेत.
तसेच, रद्द झालेल्या सदनिकांचे वाटप प्रतीक्षा यादीतील अथवा इतर पात्र अर्जदारांना करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीची नोंद घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?