पुतळ्याची जागा रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध करुण देण्यास बंजारा समाजाची सहमती...

वसंतराव नाईक यांच्या सध्यास्थित पुतळ्याची जागा रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यास बंजारा समाजाची सहमती...
महानगरपालिका प्रशासकानी मानले मनःपूर्वक आभार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक सुलभ होण्यासाठी शहरात रस्ते रुंदीकरणाची व्यापक मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलाजवळ असलेली जागा – जिथे सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. श्री वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे – रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महत्त्वाची आहे. महानगरपालिकेने सदर जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित समाजाला विनंती केली होती.
बंजारा समाजाने सामाजिक भान राखून आणि शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्याच्या भावनेने महानगरपालिकेची ही मागणी मान्य केली. याबद्दल प्रशासक तथा आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी बंजारा समाजाचे मन:पूर्वक आभार मानले आणि या समाजाने दाखवलेल्या सहकार्याचे विशेष कौतुक केले.
आज माजी उपमहापौर श्री प्रमोद राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाचे एक शिष्टमंडळांनी आयुक्तांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने रस्ता रुंदीकरणासाठी सदर जागा महापालिकेला देण्यास आपली पूर्ण सहमती दर्शवली. या निर्णयामुळे या ठिकाणच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
प्रशासक श्रीकांत म्हणाले, “बंजारा समाजाने शहराच्या हितासाठी घेतलेला निर्णय अत्यंत सकारात्मक आहे. विकासाच्या प्रक्रियेत समाजाने दाखवलेली सहकार्याची भावना ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. आम्ही त्यांच्या भावनेचा मनापासून सन्मान करतो.”
दरम्यान, वसंतराव नाईक यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली होती. ही मागणी महानगरपालिकेने मान्य केली असून सध्या नवीन पुतळ्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. चौथरा व इतर संरचनात्मक कामे अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत पुतळा पूर्णत्वास जाईल. नंतर पुतळा समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ठिकाणी पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येईल, अशी माहिती प्रशासकांनी दिली.
या शिष्टमंडळात गोरखा राठोड, राजेंद्र राठोड, रमेश पवार, राजपालसिंग राठोड, डॉ. कृष्णा राठोड, प्रा. पृथ्वीराज पवार, राजू राठोड, विनोद जाधव, एकनाथ चव्हाण, संदीप राठोड, राठोड पंडित आणि फुलसिंग जाधव यांचा समावेश होता.
What's Your Reaction?






