प्रशिक्षणार्थी अधिका-यांशी साधला संवाद... प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनसेवेची संधी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद...
प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनसेवेची संधी-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतांना आपल्याला जनसेवेची संधी प्राप्त होत असते, ह्या संधीचे सोने करत आपण अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो,अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २०२३ मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्र दर्शन दौऱ्यावर असून हे पथक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या पथकात सिद्धार्थ शुक्ला, श्रीमती लघिमा तिवारी, श्रीमती अनोष्का शर्मा, जी.व्ही.एस. पावनदत्ता, श्रीमती कश्मिरा संखे, बी. सर्वानन, श्रीमती अर्पिता ठुबे, अमर राऊत, श्रीमती वेवोतोलू केझो,रवैयाह डोंगरे, अर्जून, श्रीमती पुजा खेडकर अशा १२ अधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
प्रशासकीय कामे करतांना स्थानिक लोक, लोकप्रतिनिधी आणि शासन या तिनही पातळ्यांवर समन्वय राखणे महत्त्वाचे असते. दैनंदिन प्रशासकीय कामे करतांना अनेकदा प्राधान्यक्रम बदलत जातात मात्र असे असतांना कामाचे समाधान मिळायला हवे. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणेही आवश्यक असते. त्यासाठी कलागुणांची जोपासना करावी,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. लोकांच्या आयुष्यात आपल्या कामामुळे बदल घडत असतो याचे भान ठेवून आपण अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे,असे सांगून त्यांनी या अधिकाऱ्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच यशदा येथील समन्वय अधिकारी अमोल बामिष्टे हे यावेळी उपस्थित होते.
What's Your Reaction?