मतदान करण्यासाठी सुट्टी दिली नाही तर कार्यवाही होणार

 0
मतदान करण्यासाठी सुट्टी दिली नाही तर कार्यवाही होणार

मतदारांना मतदानासाठी सुटी देण्यात यावी-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सोमवार दि.१३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी आपल्या आस्थापनेतील कामगार/ कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत.

 लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या परिच्छेद १३५ बी नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भर पगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी मतदानासाठी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक होत असलेल्या मतदार संघ क्षेत्रात कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना तसेच जे कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. ही सुटी उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इ. ना लागू असेल. (उदा. खाजगी कंपन्या, आस्थापना, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. सर्व आस्थापना) केवळ इ. केवळ अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इ. यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी, अशी सवलत सर्व कामगारांना मिळेल अशी दक्षता सर्व मालकांनी घेणे आवश्यक आहे. आपले कामगार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सुटी न दिल्याने मतदानाचा हक्क बजावता न आल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी नमूद केले आहे. तसेच १९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघात व जिल्ह्यात सोमवार दि.१३ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी स्थानिक सुटी जाहीर करीत असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow