मसानजोगी व कब्रस्तानाचे खादीम यांना नोकरीत कायम करा - पालकमंत्री संजय शिरसाट
मसान जोगी आणि खादीम यांना कायम करा-पालकमंत्री
आई-वडिलांचा विसर पडला तर नोकरी धोक्यात !
महापालिका प्रशासकांचा नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कडक इशारा...
संत एकनाथ रंगमंदिरात लाडपागे तत्त्वावर 122 वारसांना नियुक्तीपत्रे
आमदार संजय केनेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 24(डि-24 न्यूज)- मसान जोगी आणि कब्रस्तान येथे खादीम यांना कायमची नोकरी द्यावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय शिरसाठ यांनी आज केले.
महापालिकेतील लाड-पागे समिती तत्त्वावर आज 122 जणांना नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले की मशान जोगी आणि कब्रस्तान येथील खादीम यांच्याकडे कोणी बघत नाही. जेवढी सेवा हे लोक आयुष्यभर समाजाला देतात त्याच्या परतावा म्हणून यांना महापालिकेच्या आस्थापनावर घेणे योग्य राहील. ही कारवाई एका महिन्यात करून या लोकांना महापालिकेतील कायम नोकरी द्यावी, ते म्हणाले. सफाई मजुरांचा विषयी बाबत बोलताना ते म्हणाले की महापालिकेतील कार्यरत सफाई मजुरांसाठी घरे बांधण्याची स्कीमचा डीपीआर तयार करावा. समाज कल्याण खाता त्यांच्याकडेच असून ते नक्कीच डीपीआर ला मंजुरी देऊन सफाई मजुरांसाठी त्यांच्या हक्काचे घर उपलब्ध करून देतील. किले अर्क येथील नवबत दरवाजा लगत सफाई मजूर येथे बिकट अवस्थेत राहतात. त्यांना नवीन घरे बांधून देण्याचे संकल्प मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले आहे. पालकमंत्री म्हणाले की सर्व सफाई मजुरांसाठी एक डीपीआर आयुक्तांनी सादर करावा
“आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळाली आहे. पण ती मिळताच त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची तक्रार आली तर निलंबनाचे आदेश तत्काळ काढले जातील,” असा सज्जड इशारा महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला. महापालिकेतील 122 कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे तत्त्वावर नियुक्तीपत्रे देण्याचा समारंभ शुक्रवारी (दि. 24) संत एकनाथ रंगमंदिरात पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, “यापूर्वी लाडपागे समितीच्या शिफारशीवरून झालेल्या नियुक्त्यांमुळे अनुसूचित जाती-जमातीतील कर्मचाऱ्यांनाच लाभ होत होता. मात्र आता सर्व घटकांना न्याय देण्यात येत आहे. ज्या पालकांमुळे तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे, त्यांचे आशीर्वाद विसरू नका. पालकांची तक्रार आली, तर नोकरी टिकणार नाही.” तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात आले असले तरी त्यांना आता इएसआयसीचा लाभ मिळणार नाही, असे सांगून श्रीकांत म्हणाले,
“आरोग्यविषयक संकटाच्या काळात योग्य उपचार मिळावेत, म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने आरोग्य विमा काढणे आवश्यक आहे. विमा न काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखावे,” अशा सूचना त्यांनी मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे यांना दिल्या.
मुलींना द्या लाभ...
“अनेकजण लाभासाठी मुलांना पसंती देतात, पण नंतर ते पालकांकडे दुर्लक्ष करतात. मात्र मुली कधीही आई-वडिलांना अंतर देत नाहीत. रात्री कधीही तिच्या घरी गेलात तरी दरवाजा उघडाच आढळेल. त्यामुळे लाभ देताना मुलींना प्राधान्य द्या.”
अशा भावनिक शब्दांत आवाहन करत श्रीकांत यांनी यावेळी केले.
प्रशासकांच्या निर्णयांमुळे घटली आमची लोकप्रियता
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्याचे कौतुक करत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी
हसत म्हटले की, “प्रशासकांनी एवढे निर्णय घेतले आहेत की आता आमची लोकप्रियताच कमी होत चालली आहे.”
त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांत हास्यकल्लोळ पसरला. यावेळी लाड-पागे समिती अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी जी भूमिका घेतली होती त्याबद्दल नवनियुक्त कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले याबद्दल कंत्राटी कर्मचारी यांनी पालकमंत्री संजय शिरसाट आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासाक जी श्रीकांत यांचे मोठे हार टाकून जंगी स्वागत केले. याप्रसंगी आमदार संजय केनेकर यांनीही मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?