मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मंजूर करून देण्यासाठी लाभार्थी महीलांची केली फसवणूक, लाटले 19 हजार रुपये

 0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मंजूर करून देण्यासाठी लाभार्थी महीलांची केली फसवणूक, लाटले 19 हजार रुपये

लाडकी बहीण योजना मंजूर करून देण्यासाठी लाभार्थी महीलांची केली फसवणूक, लाटले 19 हजार रुपये...!

करमाड पोलिस ठाण्यात महीलेविरुध्द गुन्हा दाखल...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करून देण्यासाठी लाभार्थी महीलांची 19 हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या महीलेविरुध्द करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी आहे राज्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व विविध शासनाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना निःशुल्क लाभ देण्यासाठी शासनाचे आदेश आहेत. महीला नामे वंदना म्हस्के, राहणार हातमाळी, हमु.चारठा, ता.जि.छत्रपती संभाजीनगर हिने उद्देश पुर्वक स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी करमाड परिसरातील लाभार्थी महीला नामे गया दशरथ कुलकर्णी, वय 35, रा.करमाड यांच्याकडून विधवा पगार योजना सुरू करण्यासाठी 4 हजार रुपये घेतले. शमीना शौकत शहा, वय 30, यांचेकडून रेशनकार्ड, संजय गांधी योजना सुरू करण्यासाठी 3 हजार रुपये घेतले. शेख हसीना शेख रईस, वय 35, संजय गांधी योजनेसाठी 2 हजार रुपये, मोनिका शिंदे, वय 45, यांचेकडून पगारासाठी 2 हजार रुपये, प्रतिभा सागर गल्हाटे, वय 25, यांचेकडून रेशनकार्ड काढून देण्यासाठी 3 हजार रुपये, अर्चना साबळे, वय 36, यांचेकडून रेशनकार्ड व संजय गांधी योजनेसाठी 5 हजार रुपये घेतले. असा तक्रारी अर्ज तहसीलदार रमेश मुंडलोड यांना प्राप्त झाला. अर्जदार यांचेकडे मुंडलोड यांनी चौकशी केली असता निष्पन्न झाले की या सर्व महीलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 19 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. मुंडलोड यांच्या आदेशाने तलाठी सजा करमाड विशाल मगरे यांच्या फिर्यादीवरून महिलेविरुध्द करमाड पोलिस ठाण्यात कलम 318(4), 35(2) भारतीय न्याय संहिता-2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उप विभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रामेश्वर ढाकणे व हेका दादाराव पवार हे तपास करत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अथवा शासनाच्या इतर योजना निःशुल्क असून वरील योजना मंजूर करून देतो असे सांगून कोणी पैशाची मागणी करत असल्यास संबंधित विभाग अथवा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करावे असे आवाहन पोलीस उप निरीक्षक पी.एम.नवघरे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow