मुख्यमंत्र्यांनी वर्गखोलीसाठी 500 कोटींचे विशेष पॅकेज द्यावे - खासदार इम्तियाज जलिल

 0
मुख्यमंत्र्यांनी वर्गखोलीसाठी 500 कोटींचे विशेष पॅकेज द्यावे - खासदार इम्तियाज जलिल

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील 3335 टिनशेडच्या वर्गखोल्यांचे बांधकामासाठी 500 कोटीच्या विशेष पॅकेजची घोषणा करावी – खासदार इम्तियाज जलील

मराठवाडा मुक्ती संग्रामनिमित्त युध्दस्तरावर बैठका सुरु । विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्गखोल्याच नाही मग हाच मराठवाड्याचा विकास का ?

औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभाची जय्यत तयारी सुरु असुन विविध स्तरावर बैठका सुरु आहेत. परंतु सद्यस्थितीत मराठवाड्याचा सर्वांगिण विकास झालेला आहे का ? सर्वसामान्य जनता आजपण मुलभुत सुविधेपासून वंचित आहेत ही वस्तुस्थिती आहे. लोकहिताचे अनेक प्रकल्प व प्रस्ताव प्रलंबितच आहेत. मंत्रालयातील सर्वच विभागाकडून मराठवाड्यावर सतत अन्याय होत असतो हे सर्वश्रुत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

          मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासने व भाषण न देता गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भवितव्याचा विचार करुन जिल्ह्यातील 832 शाळांतील 3335 पत्र्याच्या (टिनशेडच्या) वर्गखोल्यांचे व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पक्के बांधकामासाठी 500 कोटीच्या विशेष पॅकेजची घोषणा करुन त्वरीत निधीची उपलब्धता करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. तसे पत्र ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना पाठविले.

          खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केले की, संविधानाने शिक्षणाचा समान अधिकार सर्वांना दिलेला आहे. शिक्षणापासुन कोणीही वंचित राहु नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना राबविल्याचे व विविध लेखाशिर्ष अंतर्गत दरवर्षी कोट्यावधीचा निधी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी व पायाभुत सुविधेकरिता खर्च करत असल्याची माहिती प्रत्येक बैठकीत शासनाच्या वतीने देण्यात येते.  

          परंतु वस्तुस्थिती खुप भयानक आहे; औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या एकूण 3335 वर्गखोल्या आजपण पत्र्याच्या (टिनशेडच्या) असुन याव्यतिरिक्त विविध शाळेतील शेकडो वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच वर्गखोल्यांत बसुन गोरगरीब, होतकरु विद्यार्थी शिक्षण घेत आहे हि बाब संपुर्ण मराठवाड्यासाठी लाजिरवाणी, अशोभणीय व चिंताजनक असल्याचे पत्रात नमुद केले.      

          औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक, भौतिक व मुलभुत सुविधा मिळावे, शाळांचा दर्जा सुधारावा तसेच पायाभुत सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांचा पाहणी दौरा केला असता त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील विद्यार्थी हे टिनशेडच्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पत्र्याच्या (टिनशेडच्या) वर्गखोल्यांचे सर्वेक्षण करण्याचे सुचना खासदार जलील यांनी केल्या होत्या.

           त्यामध्ये तालुकानिहाय पत्र्याच्या (टिनशेडच्या) वर्गखोल्या औरंगाबाद 137 शाळेतील 512 वर्गखोल्या, कन्नड 135 शाळेतील 549 वर्गखोल्या, खुलताबाद 31 शाळेतील 120 वर्गखोल्या, गंगापूर 124 शाळेतील 484 वर्गखोल्या, पैठण 131 शाळेतील 486 वर्गखोल्या, फुलंब्री 59 शाळेतील 244 वर्गखोल्या, वैजापूर 147 शाळेतील 648 वर्गखोल्या, सिल्लोड 38 शाळेतील 185 वर्गखोल्या, सोयगाव 30 शाळेतील 107 वर्गखोल्या असे एकूण 832 शाळेतील 3335 वर्गखोल्यांचे आणि इतर मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालात नमुद करण्यात आलेले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow