मुस्लिम आरक्षण व संविधान बचावासाठी मुंबईला रवाना झाला लाॅन्ग मार्च
मुस्लिम आरक्षण, संविधान बचावसाठी मुंबईला रवाना झाला लाॅन्ग मार्च
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि संविधान वाचवण्याच्या उद्देशाने मुस्लिम इत्तेहाद आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारच्या नमाज नंतर, 13 ऑक्टोबर रोजी लाॅन्ग मार्च मुंबई मत्रालयावर रवाना झाला. यावेळी विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्चमध्ये सहभागी झालेल्यांना शुभेच्छा दिल्या.
आमखास मैदानासमोरील जामा मशिद येथे शुक्रवार दुपारची नमाज अदा केल्यानंतर दुपारी अडीच वाजता मार्चला सुरूवात झाली. मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, संविधान वाचवा अशा घोषणा देत हा पायी मार्च पोलिस बंदोबस्तात भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मायनाॅरीटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा माजी खासदार सिराज देशमुख हे या लाॅन्ग मार्चला मार्गदर्शन करत आहेत. याबाबत बोलताना जावेद कुरेशी म्हणाले की, या पायी मार्च अंतर्गत दररोज 20 किमी पायी चालणार आहे. दर 20 किमी नंतर मुक्काम केला जाईल त्या ठिकाणी नागरिकांसोबत बैठक होईल. मुस्लीम आरक्षणाची गरज आणि सद्यस्थितीत संविधानाचे रक्षण करण्याची गरज या विषयी बैठकीत माहिती दिली जाणार आहे. दररोज 20 किलोमीटर 20 दिवस प्रवास केल्यानंतर हा मार्च मुंबई मंत्रालय येथे पोहचेल. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणीचे पत्र देवून मागण्यांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती जावेद कुरेशी यांनी दिली.
लाॅन्ग मार्चमध्ये एका ट्रकमध्ये खाण्यापिण्याचे तसेच व्यवस्थापनाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी आंदोलकांच्या हातात तिरंगी झेंडे व पोस्टर होते. त्याशिवाय एक रुग्णवाहिका आणि एक डॉक्टरही सोबत गेले आहे. मार्च सहभागींना निरोप देताना माजी महापौर रशिद मामू, प्रा. ऋषीकेश कांबळे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादिचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन, इलियास किरमानी, शेख मसूद, माजी नगरसेवक अफसर खान,कृष्णा बनकर, माजी नगरसेवक अजिज खान, मोहंमद ताहेर, वंचित बहुजन आघाडीचे सतिश गायकवाड, समाजवादी पक्षाचे अब्दुल रऊफ, शेख जिया सर, एजाज जैदी, साजिद पटेल, डॉ.अफसर यांसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?