युवा व नवीन चेह-यांना संधी न देता गटनेतेपद हाजी शेरखान यांच्याकडे...

 0
युवा व नवीन चेह-यांना संधी न देता गटनेतेपद हाजी शेरखान यांच्याकडे...

युवा नवीन चेह-यांना गट नेते पदाची संधी न देता अनुभवी हाजी शेरखान यांच्याकडे 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) - तिकीट वाटपात सर्वात अगोदर उमेदवार जाहीर केले आणि आता सर्व राजकीय पक्षांच्या अगोदर एमआयएमने गटनेता जाहीर केल्याची किमया केली आहे. निवडणुकीत युवा व नवीन चेह-यांना प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संधी दिली पण गटनेता निवडताना अनुभवी व जेष्ठ नगरसेवक हाजी शेरखान यांची निवड आज करण्यात आली.

एमआयएमने छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जोरदार मुसंडी मारली. 22 माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्याचे धाडस इम्तियाज जलील यांच्या अंगलट येते की काय? अशी शंका निवडणुक प्रचारा दरम्यान, त्यांना झालेला विरोध, धक्काबुक्की आणि हल्ल्याच्या घटनेनंतर आली होती. पण मतदारांनी याचा वचपा ईव्हीएमवर पतंगाचे बटन दाबत काढला. 33 नगरसेवकांसह एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

सर्वाधिक तरूण चेहरे या निवडणुकीत एमआयएमने दिले होते. मात्र सभागृहात पक्षाची जबाबदारी देताना इम्तियाज जलील यांनी मात्र वयस्कर आणि अनुभवी चेहऱ्याला संधी देत सगळ्यांनाच धक्का दिला. पक्षाने शेर खान हाजी अब्दुल रहमान यांची आज महापालिकेतील पक्षाच्या गटनेते पदी निवड जाहीर केली. ते किराडपुरा-रहेमानिया काॅलनी प्रभाग क्रंमाक 13 मधून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पक्षाकडे अनेक तरूण चेहरे असताना पक्षाने अनुभवी चेहऱ्याला पसंती देत समन्वय साधल्याचे दिसून आले आहे. 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपाचा महापौर व उपमहापौर शिंदे सेनेकडे जाण्याची शक्यता आहे. यानंतर एमआयएमचा विरोधी पक्षनेता ठरेल अशी शक्यता आहे. या पदासाठी काकासाहेब काकडे, समीर साजिद बिल्डर, फेरोज खान, विजय वाहुळ तर महीलांमधून विजयश्री जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. 

महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले दुस-या क्रमांकावर हा पक्ष राहिला या यशानंतर पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, या निवडीकडे त्याचाच भाग म्हणून पाहिले जात आहे. मागील महापालिका निवडणुकीत एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली होती. 26 नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी सुद्धा विरोधीपक्षनेते पद मिळाले होते यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मुस्लिमबहुल भागांसह काही मिश्र वस्तीच्या प्रभागांमध्ये पक्षाने भक्कम पकड निर्माण केली. नशा मुक्ती, गुटखा विरोधात पक्षाने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

महापालिकेतील एमआयएमच्या यशामागे खासदार इम्तियाज जलील यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. शहराच्या राजकारणात स्पष्ट भूमिका, आक्रमक नेतृत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित राजकारण ही त्यांची ओळख आहे. खासदारकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पक्षाची दिशा ठरवण्यात त्यांचा प्रभाव कायम दिसून आला. महापालिकेतील नगरसेवकांना एकत्र ठेवणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहराशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेणे, यामुळे एमआयएमची ओळख आता केवळ एका विशिष्ट मतदारवर्गापुरती मर्यादित राहिलेली नाही. सर्व समाजाची मते घेण्यात आता हा पक्ष समोर येत आहे.

सध्याच्या महापालिकेत एमआयएमचे संख्याबळ 33 आहे. या नगरसेवकांच्या माध्यमातून पक्ष ठरवून दिलेल्या अजेंड्यानूसार पुढे काम करणार आहे. सत्ताधारी पक्ष व एमआयएमची कणखर भूमिका येत्या काळात सभागृहात दिसून येईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अशावेळी परिस्थितीत गटनेतेपदाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. हाजी शेरखान अब्दुल रहमान यांची निवड ही पक्षातील अनुभवी आणि आक्रमक चेहऱ्याला जबाबदारी देण्याचा निर्णय मानला जात आहे. नवीन गटनेतेपदी निवड झाल्यानंतर महापालिका सभागृहात एमआयएमची भूमिका अधिक ठाम आणि समन्वयाने मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हाजी शेरखान यांनी पक्षाचे व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे आभार मानले आहेत. आगामी काळात महापालिका निवडणुका, शहर विकासाचे प्रश्न आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता, ही निवड एमआयएमसाठी रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

नव्या विरोधी पक्ष नेत्यावर शिवसेना, भाजप या सत्ताधाऱ्यांना मनमानी कारभारापासून रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow