राजु शिंदे शिवसेनेत गेल्याने फरक पडणार नाही, 12 नगरसेवक आमच्या संपर्कात - डॉ. भागवत कराड
राजु शिंदे शिवसेनेत गेल्याने फरक पडणार नाही, 12 नगरसेवक संपर्कात- डॉ.भागवत कराड
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.8(डि-24 न्यूज) शिवसेना उध्दव ठाकरे(उबाठा) गटात भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे गेल्याने भाजपात चिंतेचे वातावरण आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.भागवत कराड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले राजु शिंदे व अपक्ष माजी नगरसेवक गोकुळ मलके गेले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा काही परिणाम होणार नाही. उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादीचे दहा ते बारा मा.नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. काही दिवसांत मोठा पक्षप्रवेश सोहळा घेतला जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिंदे हे औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणुकीत उभे राहण्यासाठी गेले आहे असले प्रकार निवडणूक जवळ आली तर होत असतात यामुळे महायुतीला काही फरक पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळ विस्तारिकरणातील अडथळे दूर, भुसंपादनाचे काम सुरू होणार...
इतर अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करणार माजीमंत्री डॉ. भागवत कराड
चिकलठाणा विमानतळ विस्तारिकरणासाठी 734 कोटींचा निधी मंजूर झाला असतानाही मागील वर्षभरापासून काम पुढे रेंगाळत गेले. त्यामुळे विस्तारिकरणामध्ये येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा.डॉ.भागवत कराड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांची बैठक घेतली. बैठकीत काही अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने निर्णय झाला असून इतर अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती डॉ. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी पुढे सांगितले चिकलठाणा विमानतळ हे जुने विमानतळ असल्याने उड्डान योजनेत याचा समावेश होऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी येथील धावपट्टी 9300 वरून 1200 फूट करणे आवश्यक आहे. विमानतळ विस्तारिकरणासाठी पूर्व बाजुला 139 एकर तर टॅक्सीवेसाठी मुकुंदवाडी भागात 8 एकर जमिनीची आवश्यकता आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने मागील बजेटमध्ये 734 कोटींची तरतूद केलेली आहे. जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून मनपाचे भूसंपादन अधिकारी (विशेष घटक) विश्वनाथ दहे यांची नियुक्ती केली आहे. परंतु मागील वर्षभरापासून भूसंपादनामध्ये कोणतीही प्रगती झाली नाही, याबाबत डॉ. कराड यांनी खंत व्यक्त केली. एवढेच नाही तर दहे दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे दहे यांच्या ठिकाणी नवीन व्यक्तीची नियुक्ती करावी किंवा दहे यांनाच कायम ठेवावे, याबाबत राज्य शासनाकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. धावपट्टीला सुखना नदीचे पात्र आणि एका राज्य रस्त्याचा अडथळा असल्याचे बैठकीत समोर आले. या नदीपात्राचे काय करायचे, असा प्रश्ना विमानतळ प्राधिकरणाकडे गेल्यानंतर या पात्रावर 280 मीटर सिमेंट स्लॅब टाकण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे. तसेच या भागातील राज्य रस्त्याबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच राज्य रस्ता विभाग, रेल्वे आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीपैकी 3 टक्के निधी महानगर पालिकेला दिला जाणार असून सर्व सुविधा पुरविणार असल्याचे मनपा आयुक्तांनी मान्य केले आहे.
इमिग्रेशनसाठी गृहमंत्रालयात पाठपुरावा
चिलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण आवश्यक आहे. मुंबईचे विमानतळावर ट्राफीक जास्त असल्यामुळे फ्लाईट डायव्हर्ड कराव्यात लागतात. हैदराबाद किंवा अहमदाबाद हे दोनच पर्याय आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास ही विमाने येथे डायव्हर्ड होवू शकणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कस्टम आणि इमिग्रेशन या दोन गोष्टीची आवश्यकता आहे. कस्टमचे नोटिफिकेशन निघाले आहे. इमिग्रेशनसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने स्टाफ मंजूर केला आहे. गृह मंत्रालयात पाठपुरावा करून इमिग्रेशनची मंजुरी लवकरच घेतली जाईल, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.
एअर रशियाची बँकॉक सेवा लवकरच
एअर रशियाने चिकलठाणा विमानतळाला पत्र पाठविले असून 31 जुलैपर्यंत इमिग्रेशनची व्यवस्था केल्यास ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून बॅंकॉकला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. इमिग्रेशनसाठी उशीर झाला तर जास्तीत जास्त तीन महिने उशीर होईल. आठवड्यातून तीन वेळा ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू राहणार असल्याचे सांगितले. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होताच धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी केंद्रातून पाचशे कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.
What's Your Reaction?