राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दोन दिवस दौरा, घेणार जनसुनावणी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दोन दिवस
जिल्हादौऱ्यावर; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा, आढावा व जनसुनावणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.12(जिमाका)- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर ह्या गुरुवार दि.13 व शुक्रवार दि.14 असे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा, जनसुनावणी, महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक व पत्रकार परिषद असे दोन दिवस त्यांचे कार्यक्रम आहेत.
गुरुवारी(दि.13) महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा...
गुरुवार दि.13 रोजी जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाच्या अनुषंगाने विविध शासकीय कार्यालयातील महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात गुरुवार दि.13 रोजी सकाळी पावणे दहा ते सायं.4 यावेळात ही कार्यशाळा होणार आहे. महिलांच्या विविध समस्या, त्यावरील उपाययोजना, महिलांचे आरोग्य, सुरक्षितता तसेच महिलांसाठी असणाऱ्या विविध योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत या कार्यशाळेत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
शुक्रवारी(दि.14) जनसुनावणी....
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. त्यानुषंगाने महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिकस्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि.14 रोजी सकाळी साडेदहा वा. जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे समवेत सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे या उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील कोणतीही तक्रारदार पिडीत महिला कोणतीही पुर्वसुचना न देता सदर स्थानिक पातळीवर थेट जनसुनावणीस उपस्थित राहुन आपली लेखी समस्या / तक्रार आयोगापुढे मांडु शकेल. या जनसुनावणीस पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक असे विविध प्रशासकीय प्रमुख उपस्थित असल्याने तात्काळ कार्यवाही करणे शक्य होते. तरी या जनसुनावणीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त तक्रारदार पिडीत महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
आढावा बैठक व पत्रकार परिषद
तसेच महिला व बालकांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक श्रीमती चाकणकर ह्या शुक्रवार दि.14 रोजी दुपारी 3 वा. घेणार आहेत. त्यानंतर सायं. 5 वा. त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
What's Your Reaction?






