रोख मोबदल्यासाठी मालमत्ताधारकांना वाट पाहावी लागेल - आयुक्त जी.श्रीकांत

रोख मोबदल्यासाठी वाट पाहावी लागेल - आयुक्त जी.श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - शहरात रस्ता रुंदीकरणात बाधित मालमत्ताधारकांकडून रोख मोबदल्याची मागणी होत आहे. नागरिकांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीही घेत आहेत, मात्र जेव्हा जागा ताब्यात घेवू,तेव्हाच मोबदला मिळेल. आता मोबदला पाहिजे असेल तर अर्ज करा, टीडीआर घ्या, किंवा रोख मोबदला पाहिजे असेल तर थांबावे लागेल असे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
दोन महीन्याच्या कालावधीत मनपा प्रशासनाने अनाधिकृत बांधकाम व रस्ता रुंदीकरणात पाच हजाराहुन अधिक मालमत्तांवर बुलडोझर फिरवला.
जून महिन्यात बीड बायपासवरील देवळाई चौक ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्किंग करून बाधित अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. त्यानंतर जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रोड, रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप रोड, दिल्लीगेट ते हर्सुल टि-पाॅईंट ते जळगांव रोड सिडको बस स्टॅण्ड आदींसह विविध रोडवर पाडापाडी केली. तसेच शहरातील काही रस्त्यांवर मार्किंगचे काम पूर्ण केले. हर्सुल, बाबा पेट्रोलपंप ते दिल्लीगेट, सेवन हिल ते उस्मानपुरा, देवळाई चौक ते झाल्टा फाटा पर्यंत मार्किंग करण्यात आली. आता पाडापाडीनंतर महापालिका रस्त्यासाठी जागा संपादित करून त्याचा मोबदला देईल, त्या पैशातून दुसऱ्या ठिकाणी दुकान, घर घेण्याचे, नव्याने आयुष्य सुरू करण्याचे मनसुबे बाधित मालमत्ताधारकांचे आहेत. काही दिवसांपूर्वी बीड बायपासवरील मालमत्ताधारकांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेवून मोबदला देण्याची मागणीही केली आहे. काही धार्मिक स्थळे या कार्यवाहीत बाधित होणार आहे. कमिटींना, पोलिस प्रशासनाला विश्वासात घेवूनच धार्मिक स्थळे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेणार असे आयुक्तांनी स्पष्ट केले काही लोक संभ्रम निर्माण करत आहे त्यांना कळायला हवे यामध्ये न्यायालयाची अवमानना झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाधित मालमत्ताधारकांच्या नजरा आता महापालिका आयुक्तांकडे लागलेल्या आहेत.
यासंदर्भात बोलताना आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले की, रस्त्यालगतच्या विनापरवानगी बांधलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. रस्त्यात बाधित होत असलेला मालमत्तेचाच भाग पाडण्यात आला. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी संपूर्ण मालमत्ता पाडावी लागली. बांधकाम पाडले त्याचा मोबदला देण्याचा विषय नाही. ते अनधिकृतच होते. रस्त्यांची रुंदी विकास आराखड्यात यापूर्वीच जाहीर झालेली आहे, ती माहित असतानाही, बांधकाम केले. अशा मालमत्ताधारकांना मोबदला मिळणार नाही. महापालिकेची अधिकृत परवानगी घेवून बांधकाम केलेल्या मालमत्ताधारकांनाच मोबदला दिला जाईल. आज फक्त बांधकाम पाडले आहे, आम्ही जेव्हा जागा ताब्यात घेवू तेव्हा मोबदला देवू. आरक्षित जागेवर केलेल्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही., असे जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिक जेव्हा मालमत्ता कर आणि गुंठेवारी करतील, तेव्हाच मनपाकडे पैसे येतील, त्यानंतरच मोबदला देता येइल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे रोख मोबदल्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल, हे मात्र आता काळच ठरवेल.
मोबदला देण्यासाठी टीडीआरच घ्या, असे आम्ही बंधनकारक केलेले नाही. मोबदला देण्याचा तो एक प्रकार आहे. कायद्यात मोबदला देण्याचे 6 विविध प्रकार आहेत. यात टीडीआर, एफएसआय, गुंठेवारी अधिनियम, रोख मोबदला, रिझर्वेशन क्रेडीट सर्टिफिकेट आणि अकोमडेशन रिझर्वेशन आदींचा समावेश आहे., असे आयुक्तांनी सांगितले.
What's Your Reaction?






