शहरात बुलडोझर कार्यवाई विरोधात पहीला एल्गार मोर्चा...

शहरात बुलडोझर कार्यवाई विरोधात पहीला मोर्चा...
मनपाच्या बुलडोरशाही विरोधात बेघर निर्वासितांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा...
मनपा आयुक्तांची बदली, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करा, अगोदर बाबा पेट्रोल पंप ते केंब्रीज चौक हा रस्ता पूर्णपणे मोकळा करा त्यानंतरच शहरात कार्यवाई करण्याची पँथर नेते दिपक केदार यांची मागणी....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज) -
शहरात महापालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण कार्यवाई सुरु आहे. शहरात या कार्यवाई विरोधात पहिला मोर्चा क्रांतीचौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. प्रमुख नेत्यांनी यावेळी आपले मत अक्रामकपणे मांडले.
‘नही चलेगी नही चलेगी, बुलडोजरशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत शहरातील निर्वासितांनी महानगरनगरपालिका करीत असलेल्या कारवाईच्या विरोधात संताप व्यक्त केला. सर्वधर्मीय, सर्वपक्षीय आणि आंबेडकरवादी संघटनाच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरात आणि जिल्ह्यात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या बुलडोजर कारवाईत गरीबांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने पीडितांचे पुनर्वसन करुन योग्य मोबदला द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौकमार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. चंपा चौक ते जालना रोड नागरी वसाहतीमधून जाणारा शंभर फुट मार्ग रद्द करावा, जुन्या वसाहतीमधील बांधकामे पाडण्याअगोदर मालमत्ताधारकांचे पुनर्वसन करुन योग्य मोबदला द्यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हर्सूल येथील पुतळा मुख्य चौकात स्थलांतरीत करावा, संजयनगर-मुकुंदवाडी येथील विद्यापीठ नामांतर लढ्याची प्रतिकृती तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, उस्मानपुरा येथील बाधित होणारी कमान बाजूच्या जागेत बांधून द्यावी, जिल्हाधिकारी कार्यालयाने 17 जुलै रोजी काढलेला गायरान अतिक्रमण निष्कासित करण्याचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे, गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावावर सातबारा करुन द्यावा, शहरातील सर्व झोपडपट्ट्यांना ‘पीआर’ कार्ड देऊन वसाहती संरक्षित कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. अतिक्रमण काढण्याच्या सबबीखाली ऐन पावसाळ्यात हजारो शहरवासियांना बेघर करण्यात आले. या समाजबांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात दीपक निकाळजे, अरविंद कांबळे, दीपक केदार, अमित वाहुळ, जयश्री शिर्के, विष्णू जगताप, आनंद कस्तुरे, जयेश अभंग, मनोज जाधव, मिलिंद बनसोडे, विजय शिंगारे, वसंतराज वक्ते, बलराज दाभाडे, जावेद कुरेशी, अब्दुल हाफिज, सिध्दोधन मोरे, नागेश केदारे, विजय बचके, सचिन जोगदंडे, संतोष चव्हाण, राजकुमार कांबळे यांच्यासह शेकडो महिला, बाधित नागरिक सहभागी झाले होते.
What's Your Reaction?






