मनपा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 8 हजार मतदान केंद्रांध्यक्ष व अधिका-यांचे उद्या प्रशिक्षण...

 0
मनपा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 8 हजार मतदान केंद्रांध्यक्ष व अधिका-यांचे उद्या प्रशिक्षण...

एकूण 8 हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे उद्या प्रशिक्षण

मनपा सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रशासन सज्ज...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उद्या, दिनांक 28 डिसेंबर रोजी एकूण 8 हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 8 हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम उद्या दोन सत्रांमध्ये पार पडणार असून, सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 ते 8 यांच्या अंतर्गत प्रत्येकी एक हजार मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी याप्रमाणे एकूण 8 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हे प्रशिक्षण शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले असून, त्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा; एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड तसेच मुख्य नाट्यगृह,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

येथील स्थळांचा समावेश आहे.

प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रिया व ईव्हीएम हाताळणी, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, मतदान दिवशी घ्यावयाची खबरदारी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे असून, या प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रियेतील त्रुटी टाळण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow