एकाच पक्षाला दिर्घकाळ सभास्थळ आरक्षित ठेवण्यास मनाई, निवडणूक कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही - मनपा आयुक्त

 0
एकाच पक्षाला दिर्घकाळ सभास्थळ आरक्षित ठेवण्यास मनाई, निवडणूक कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही - मनपा आयुक्त

एकाच पक्षाला अथवा उमेदवारास दीर्घकाळ सभास्थळ आरक्षित ठेवण्यास मनाई...

निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत

रुजू न झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.27(डि-24 न्यूज )—छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व तयारीचा सखोल आढावा घेताना आयुक्त तथा प्रशासक व निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे व कडक निर्देश दिले.

निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला शहरातील एकाच मैदान, सभागृह किंवा सभास्थळ सलग आठ ते दहा दिवस आरक्षित ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेत सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना प्रचारासाठी समान संधी मिळणे हा लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित बैठकीत निवडणूक नियोजन, प्रचार व्यवस्थापन, मनुष्यबळ, प्रशिक्षण व आचारसंहिता अंमलबजावणी या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रचारासाठी वापरण्यात येणारी शासकीय, निमशासकीय तसेच खासगी मैदान, सभागृह व इतर सार्वजनिक स्थळे कोणत्याही एका पक्षाच्या ताब्यात दीर्घकाळ राहणार नाहीत, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एखाद्या स्थळासाठी एकाच वेळी दोन किंवा अधिक पक्षांचे अर्ज प्राप्त झाल्यास, प्रथम अर्ज दाखल केलेल्या पक्षास किंवा उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रत्येकी नऊ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांमधील उपलब्ध सोयी-सुविधांचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व तांत्रिक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

उद्या होणाऱ्या मतदान केंद्रप्रमुख व मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेताना श्रीकांत यांनी प्रशिक्षण दर्जेदार व प्रभावी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, नियमावली व आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती यांची सुस्पष्ट माहिती दिली जावी, असे निर्देश त्यांनी दिले.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक दहा ते पंधरा मतदान केंद्रांमागे एक क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात यावा. ज्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात कर्मचारी अपुरे आहेत, त्या ठिकाणी तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून निवडणूक कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

शहरात प्रथमच प्रभाग पद्धतीने महानगरपालिका निवडणुका होत असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये मतदान पद्धतीबाबत जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एक डेमो ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून उमेदवार व नागरिकांना प्रत्यक्ष पद्धतीची माहिती मिळू शकेल, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

 रुजू न झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई...

मनपा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक आदेश देण्यात आले आहेत, मात्र जे अद्याप कामावर रुजू झालेले नाहीत, अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

आचारसंहिता कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेताना अनेक अधिकारी व कर्मचारी, विशेषतः एसएसटी पथकासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी अद्याप रुजू न झाल्याची बाब निदर्शनास आली. निवडणूक कामकाजात कोणतीही चालढकल, दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसून, जे अधिकारी-कर्मचारी आदेश असूनही रुजू झालेले नाहीत, त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहनही श्रीकांत यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow