शहरात भव्य बुध्दमुर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा शुक्रवारी

 0
शहरात भव्य बुध्दमुर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा शुक्रवारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य बुद्धमुर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) २८ मार्च २०२५ रोजी शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते बुद्धमुर्तीचे लोकार्पण होणार आहे. तसेच या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे विशेष उपस्थित राहणार आहेत.

बौद्ध धम्माचा प्रचार व शांतीचा संदेश

या मंगलप्रसंगी पूज्यनीय भदंत बोधीपालो महाथेरो व भिक्खु संघाच्या वतीने प्रतिष्ठापना पूजन आणि धम्मदेसना होणार आहे. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विमान प्राधिकरणाचे पदाधिकारी आणि बिमाटा संघटनेचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसह शहरातील औद्योगिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

बुद्धमूर्ती स्थापनेमागील संकल्पना आणि प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर हे जागतिक पातळीवर ओळखले जाणारे शहर आहे. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधून बौद्ध संस्कृतीचे जगभर दर्शन होते. जगभरातून येथे येणाऱ्या पर्यटकांना शहराच्या ऐतिहासिक वारशाची जाणीव व्हावी, यासाठी विमानतळावर भव्य बुद्धमुर्ती उभारण्याची कल्पना पुढे आली. बिमाटा संघटनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाचे तत्कालीन प्रमुख श्री. साळवे यांच्याकडे सादर केला. ११ जानेवारी २०२३ रोजी या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी मिळाली. त्यानंतर योग्य बुद्धमुर्तीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि अखेर तेलंगणातील आलागट्टा येथे १५.५ फूट उंच आणि अखंड बेंगळोरी ग्रॅनाइटमध्ये कोरलेली अभयमुद्रा असलेली बुद्धमूर्ती तयार करण्यात आली. ही बुद्धमूर्ती ५ मे २०२३ रोजी बौद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्थानापन्न करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करून २८ मार्च २०२५ रोजी तिचे भव्य लोकार्पण करण्यात येणार आहे.

शांती, अहिंसा आणि बंधुत्वाचा संदेश

बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना ही केवळ वास्तुशिल्प नव्हे, तर संपूर्ण जगाला शांती, अहिंसा आणि बंधुत्वाचा संदेश देणारी आहे. बुद्धिस्ट इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पुढाकाराने साकार झालेला हा प्रकल्प बौद्ध संस्कृतीचा जागतिक स्तरावर सन्मान वाढवणारा ठरणार आहे.

विमानतळ परिसर अतिसंवेदनशील असल्यामुळे हा सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. तथापि, ही ऐतिहासिक घटना शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशात एक सुवर्णक्षण ठरेल. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरस अँड ट्रेडर असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद थोरात, सुभाष मुदगावकर, प्रवीण कुमार वसाते, सिद्धार्थ जाधव, मिलिंद बागुल, बाळासाहेब पठारे, सूर्यकांत कोटकर, रामचंद्र पठारे, सुभाष मोरे विनोद अवसरमल, प्रमोद राऊत, संदीप केदारे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow