श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा हाच एकात्म मानवदर्शनचा पाया - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा हाच ’एकात्म मानवदर्शन’चा पाया...
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन...
’पंडित दीनदयाळ उपाध्याय’ यांच्यावरील परिसंवाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)दि.26(डि-24 न्यूज)-: अखेरच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य-लोकशाहीला काही अर्थ उरत नाही, हा पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा विचार होता. तसेच श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा व चांगले दिवस यावेत हाच त्यांच्या ’एकात्म मानव दर्शन’ विचाराचा पाया होता, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’पंडित दीनदयाल उपाध्याय : एकात्म मानव दर्शन’ या विषयावर 25 व 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. मुंबई येथील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा परिसंवादात संयुक्त सहभाग राहिला.
दिन दयाल उपाध्याय कौशल्य केंद्र यांच्यावतीने सिफार्ट सभागृहात आयोजित या परिसंवादात मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (दि.26) सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.विजय फुलारी हे होते. यावेळी पुनरत्थान समरसता गुरुकुलचे संस्थापक गिरीश प्रभुणे, यांत्रिक अभियंता आर.एस.हिरेमठ, डॉ.उपेंद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, डीडीयुकेके संचालक डॉ.भारती गवळी, संचालक डॉ.प्रवीण वक्ते आदीची उपस्थिती होती.
तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथ देवधर, डॉ.गजानन सानप, मुकूंद कुलकर्णी, अमित रंजन , अधिसभा सदस्य किशोर शितोळे हेही उपस्थित होते. यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ’एकात्म मानवदर्शन’ या विचारांचे हे हीरक महोत्सवी वर्ष होत आहे. या निमित्त दोन्ही विद्यापीठांनी अत्यंत महत्वपूर्ण चर्चा घडवून आणली. समाजातील 20 टक्के लोक 90 टक्के रिसोर्सेस वापरतात तर 80 टक्के लोकांना केवळ 10 टक्केच रिसोर्सेस वापरण्यास मिळते. ही दरी कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. तर पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा हा विचार सम्रग मानव विचारासाठी उत्तम दृष्टीकोन असल्याचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. या परिसंवादातील चर्चा ही अत्यंत उद्बोधक व दिशादर्शक असल्याचेही ते म्हणाले. तर समाज, सामाजिक नवोन्मेष व सामाजिक उद्योजकता या विषयावर आर.एस.हिरेमठ यांनी सविस्तर विवेचन केले.
परिसंवादाची एकात्म मानव दर्शनाची मूलभूत तत्त्वे समजून घेणे, अंत्योदयाची संकल्पना आणि तिचा सामाजिक परिणाम समजून घेणे, कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबन साधणे, ग्रामीण विकासासाठी तत्त्वज्ञानाचा वापर समजून घेणे, एकात्म मानव दर्शनावर आधारित आर्थिक विकास ही उद्दिष्टये असणार आहेत, असे प्रास्ताविकात डॉ.उपेंद्र कुलकर्णी म्हणाले. डॉ.अर्पणा अष्टपुत्रे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.भारती गवळी यांनी आभार मानले. देशभरातून 150 प्रतिनिधी परिसंवादात सहभागी झाले आहेत. या परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ.उपेंद्र कुलकर्णी यांचा मा.मंगलप्रभात लोढा, गिरीष प्रभुणे व मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी सत्कार केला. दिनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
दोन दिवस मंथन :
दोन दिवसातील विविध सत्रात प्रा.सचिन मांडवगणे (कृषी कचरा पुनर्वापर), निलेश लेले (अन्नप्रक्रिया उद्योगातून ग्रामीण आर्थिक विकास), प्रशांत देशपांडे (आत्मनिर्भर भारत), आर.एस.हिरेमठ (सामाजिक उद्योजकता), हर्षल विभांडीक (ग्रामीण उद्योजकांसाठी डिजिटल सेवा), सचिन देशपांडे (शालेय शिक्षणातले अभिनव प्रयोग), दिनकर पाटील (आदिवासीसाठी मध उद्योग) यांनी मार्गदर्शन केले. तसेच जन शिक्षण संस्थान (महिलाच्या उन्नतीसाठी कौशल्य प्रशिक्षण), कृषी विज्ञान केंद्र (शेतीतील नवीन प्रयोग), दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास केंद्र, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ वंचित महिलांचा विकास, संस्कृतीक संवर्धन मंडळ ग्राम विकास या संस्थतर्फे सादरीकरण करण्यात आले.
What's Your Reaction?






