हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा...
हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27 (डि-24 न्यूज) :- राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर श्री. बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले. श्री. बागडे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व व राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त श्री.बागडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री.रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्ट मैदान, येथे झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर, रमेश पतंगे, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, माजी महापौर बापू घडामोडे, आयोजन समितीचे अध्यक्ष विवेक देशपांडे, नाशिक काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर दास महाराज, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामोदर नवपूते, श्री. विजय औताडे, संजय खंबायाते, उद्योगपती राम भोगले आदी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले की, कार्यकर्ता, स्वयंसेवक म्हणून काम करताना अनेक अडचणी होत्या. मात्र बागडे यांनी त्याकाळी आपले काम निष्ठेने केले. शिक्षण, दुग्ध व्यवसाय, बँक सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहे. ते सातत्याने काम करत राहिले, त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडले पाहिजेत. विचारधारा महत्वाची असते, हेच त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्ता घडला पाहिजे. अलग भाषा अलग वेश, फिर भी अपना एक देश अशी भावना ठेवत देशाला पुढे घेऊन जायचे आहे, असे श्री गडकरी म्हणाले.
श्री. बागडे यांनी निस्वार्थ पणाने आयुष्यभर काम केले आहे. आणि त्यांना पदे मिळत गेली. साधी राहणी ही आमची शिकवण आहे. कठीण काळ होता, वीस वर्ष गावागावात फिरायचो. आज मान मिळतोय पण तो आमचा नाही तर हरिभाऊ सारख्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता हरिभाऊ यांनी काम केले. देव दुर्लभ कार्यकर्ता हरिभाऊ यांच्या माध्यमातून लाभला आहे, असा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी बोलतांना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, दीड वर्षांपूर्वी निवडणूक लढणार नाही असे सांगितले होते. सामाजिक जीवनात जे काम मिळेल ते करणार अस सांगितले. मात्र ध्यानीमनी नसताना अचानक राजस्थान राज्याचा राज्यपाल झालो. फुलंब्री मतदारांमध्ये जलसंधारण, रस्ते विकासाचे काम केले. अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागतील, असे ते म्हणाले.
मंत्री अतुल सावे म्हणाले, श्री. बागडे यांनी प्रत्येक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य केले आहे. वृत्तपत्र वाटपापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आहे. आज सहकार तसेच सामाजिक कार्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. राष्ट्र प्रथम व शेवटी मी अशी भावना ठेवून त्यांनी काम केले आहे. सहकारी साखर कारखाना, देवगिरी बँक अडचणीत असताना आपल्या व्यवस्थापनाने त्यांनी अडचणीतून मार्ग काढला आहे. त्यासोबतच फुलंब्री तालुक्यात 'कोल्हापूरी बंधाऱ्याचा पॅटर्न' त्यांनी रूजविला आहे. राज्यपाल श्री. बागडे यांचे कार्य आपल्यासाठी कायम मार्गदर्शक राहिले आहे.
माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी श्री. बागडे यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. श्री.हरिभाऊ बागडे यांनी सहकार, शिक्षण, क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. सातत्य सेवाभाव, सुनियोजन, सांघिक वृत्ती, सहनशिलता, स्वच्छ प्रतिमा या सर्व गोष्टी त्यांच्यात आहेत त्यामुळेच कार्यकर्ता ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास आपल्या सर्वांसमोर आदर्श ठरणारा आहे, असे माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.
माजी मंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, श्री. बागडे यांनी आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त समाजकारण केले आहे. आपल्या प्रत्येक कार्यातून त्यांनी ते दाखुन दिले आहे. निस्वार्थी कार्याचा हा गौरव समारंभ आहे. श्री. बागडे यांची कारकीर्द नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे.
'माझा प्रवास' या श्री. बागडे यांच्या जीवन प्रवासावरील पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. श्री. रमेश पतंगे यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली.
पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व किनगाव सुपुत्र श्री. अतुल चव्हाण यांनी प्रमाणपत्रावरील मजकुराचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.
यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?