अँटी-इन्कम्बन्सी आणि देशभरातील आंदोलनामुळे पराभव, सतीश चव्हाण यांची कबुली
अँटी-इन्कम्बन्सी आणि देशभरातील आंदोलनांमुळे पराभव; सतीश चव्हाण यांची कबुली
सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केले, अजितदादांची उणीव भासली; पडद्यामागून विरोध करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी... म्हणाले माझा पराभव नाही घात झाला....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 2 (डि-24 न्यूज) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवामागे अँटी-इन्कम्बन्सी, देशभरात सुरू असलेली आंदोलने आणि सोशल मीडियावरील निष्क्रियता ही प्रमुख कारणे असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पराभवाची कारणे स्पष्ट करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
या निवडणुकीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचे चव्हाण म्हणाले. गेल्या 18 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली; मात्र त्या कामांची योग्य प्रसिद्धी केली नाही. 2014 पासून देशाच्या राजकारणात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केले, ही आपली चूक असल्याचेही त्यांनी मान्य केले.
रिल स्टार रविराज साबळे यांना 20 हजारांहून अधिक मते मिळतील, तर निवडणुकीच्या अवघ्या पंधरा दिवस आधी मैदानात उतरलेल्या उमेदवाराला 80 हजार मते मिळतील, असा अंदाज नव्हता, असेही चव्हाण यांनी सांगितले.
आमदार अब्दुल सत्तार यांनी उघडपणे आपल्या विरोधात भूमिका घेतली. त्यांच्यावर शिवसेना नेतृत्वाने कारवाई करावी, अशी मागणी आपण आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महायुतीतील काही नेत्यांनी समोरून आपल्यासोबत राहून प्रचार केला; मात्र पडद्यामागून विरोधात काम केले. अशा नेत्यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रचारादरम्यान बेरोजगारी आणि एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेली नाराजी जाणवली. या नाराजीचाही निवडणुकीवर परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. पदवीधर मतदारसंघातील या पराभवाचे पडसाद 2029 च्या निवडणुकीतही उमटू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
"पराभव मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो. जिंकलो तर माजायचे नाही," ही शिकवण अजितदादा पवार यांनी दिल्याचे सांगत आपण पराभव स्वीकारत असल्याचे चव्हाण म्हणाले. निवडणुकीत विजयी झालेले डॉ. प्रतापसिंह पाटील आणि युवकांची मोठ्या प्रमाणात मते मिळविणारे रविराज साबळे यांचेही त्यांनी आभार मानले.
यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित केले.
What's Your Reaction?