अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

 0
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी 

यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सहा. व्यवस्थापक राहुल गुप्ता, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. 

 बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदार संघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. १९- औरंगाबाद मतदार संघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत. जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार७०७ मतदार आहेत. त्यात जालना मतदार संघात १० लाख ६,४८७ तर औरंगाबाद मतदार संघात २० लाख ६१ हजार २२० मतदार आहेत. जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्य बळाची गरज असून २० हजार ५२४ कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली.

  बैठकीस मार्गदर्शन करतांना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणवू नयेत, यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वृद्ध, दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी, त्यांना विनात्रास मतदान करता यावे, याची दक्षता घ्यावी. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवर पाठवावेत. मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्या असे निर्देश त्यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow