150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम, विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे...
150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम...
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 27 (डि-24 न्यूज) – राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्याकडून करण्यात आले. या मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयात ई-गव्हर्नन्स उपक्रमांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात आली. विभागनिहाय सातत्यपूर्ण आढावा, ई-ऑफिसचा प्रभावी वापर तसेच नागरिक-केंद्रित निर्णय प्रक्रियेवर भर देण्यात आल्याने विभागाला हे यश मिळाले आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या या मूल्यमापनात कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तसेच GIS तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात झालेला वापर या सात निकषांवर कामगिरी तपासण्यात आली.
राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी अपर विभागीय आयुक्त प्रताप काळे, अपर विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, अपर विभागीय आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, सहआयुक्त राजेश काटकर, उप आयुक्त दादासाहेब वानखेडे, उपआयुक्त सुषमा देसाई, सहायक आयुक्त सरीता सुत्रावे, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी विद्याधर शेळके, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले की, 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमामुळे शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित झाले आहे. ही कामगिरी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, भविष्यातही प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू ठेवला जाईल.
धाराशिव व लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांची निवड...
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयांच्या कामगिरीचेही मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी कार्यालयांत धाराशिव व लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांचा समावेश झाला आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामगिरीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात 9 नगरपरिषदांची उत्कृष्ट कामगिरी...
प्रशासकीय सुधारणा अंतर्गत राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत नगरपालिका गटात राज्यातील निवड झालेल्या 17 पैकी 9 नगरपालिका छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा, धाराशिव जिल्ह्यातील कळंब, तुळजापूर, लोहारा, नळदुर्ग तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेचा समावेश आहे.
What's Your Reaction?