गरीब ठेवीदारांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी आदर्शची मालमत्ता शासनाने खरेदी करावी - खा.इम्तियाज जलिल

 0
गरीब ठेवीदारांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी आदर्शची मालमत्ता शासनाने खरेदी करावी - खा.इम्तियाज जलिल

गरीब ठेवीदारांना दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी आदर्शची मालमत्ता शासनाने खरेदी करावी; अन्यथा ठेवीदारांसह आमरण उपोषण करणार – खासदार इम्तियाज जलील

आदर्श मालमत्ता लिलावाव्दारे विक्रीसाठी दोन निविदा जारी; पहिल्या निवेदेत 2 तर दुसऱ्यात 20 मालमत्तांची होणार होती विक्री 

औरंगाबाद,दि.2(डि-24 न्यूज) आदर्श पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावास प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने लिलावाची मालमत्ता स्वत: खरेदी करुन गोरगरीब ठेवीदारांना दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी ठेवीची रक्कम परत करुन सहकार्य करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास समस्त ठेवीदारांसह लवकरच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्राव्दारे कळविले. मुख्यमंत्री, सहकारी मंत्री यांच्यासह जिल्हा उपनिबंधक बारहाते व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना सुध्दा याबाबत पत्र दिले.

          आदर्श पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाव्दारे विक्री करण्यासाठी शासनाने आता पर्यंत दोन निविदा प्रसिध्द केलेल्या आहेत. पहिल्या निविदेत 2 मालमत्ता व दुसऱ्या निविदेत 20 मालमत्ता लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार असुन त्यास खरेदीदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.  

          खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, आदर्श सहकारी पतसंस्थेत 40 हजाराहुन जास्त गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लिलावाव्दारे विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने मालमत्ता लिलावाव्दारे विक्रीची निविदा सुध्दा प्रसिध्द करण्यात आली होती. परंतु त्या निविदेस कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच कोणतीही संस्था अथवा व्यक्ती लिलावात मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक ही नाही. अशा परिस्थितीत गोरगरीब ठेवीदारांना त्यांच्या हक्काची रक्कम कधी मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  

          पुढे नमुद केले की, दिवाळी सण आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी सर्वजण फराळाच्या तयारीत व्यस्त असुन लहान मुले-मुली मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्याची तयारीत आहेत. परंतु आदर्श पतसंस्थेतील गोरगरीब ठेवीदारांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होवून त्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मग अशा परिस्थितीत इतर लोकांप्रमाणे गोरगरीब ठेवीदार आनंदोत्सवात दिवाळी कशी काय साजरी करणार ? अनेक ठेवीदारांनी तर आत्महत्या सुध्दा केलेल्या आहेत.

          आदर्श पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावास प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने लिलावाची मालमत्ता स्वत: खरेदी करुन गोरगरीब ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत करावी जेणेकरुन ठेवीदारांच्या घरात सुध्दा आनंदोत्सावात दिवाळी सण साजरा करता येईल. त्यानंतर शासनाने ती मालमत्ता त्यांच्या सोयीने वापरात घ्यावी अथवा त्याचा मोठ्या स्तरावर लिलाव करण्यात यावा असे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow