गोवंश तस्करी करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांची कारवाई, 12 गुन्हे दाखल, 38 लाखांचा मुद्देमाल जप्त...!
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका; विशेष धडक मोहिमेत 12 गुन्हे दाखल, 18 आरोपींवर कारवाई, तर तब्बल 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) - आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने जिल्हा हद्दीत बेकायदेशीर कृत्यांविरोधात अत्यंत आक्रमक आणि प्रभावी पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा हद्दीत दि. 16/5/2026 पासून "विशेष धडक मोहीम" अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल, गोमांस वाहतूक आणि गोवंश जनावरांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या तस्करांचे कंबरडे तोडत मोठे यश संपादन केले आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाभरातील संशयास्पद आणि छुप्या मार्गांवर नाकाबंदी आणि कडक गस्त तैनात करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या वैजापूर, फुलंब्री, वडोद बाजार, करमाड, फर्दापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड ग्रामीण, कन्नड ग्रामीण आणि खुलताबाद या 10 पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध छापे टाकून कारवाया केल्या आहेत.
पोलिसांच्या या चोख कामगिरीमुळे आतापर्यंत एकूण 12 गुन्हे नोंदवण्यात आले असून, गुन्ह्यात सामील असलेल्या 18 आरोपींना निष्पन्न करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गोमांस जप्ती आणि विल्हेवाट: ग्रामीण पोलिसांच्या विविध शोध पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे ठिकठिकाणी छापे मारून एकूण 6,75,000 (सहा लाख पंच्याहत्तर हजार) रुपये किमतीचे तब्बल 865 किलो गोमांस (बीफ) जप्त करण्याची मोठी कामगिरी केली. सदर जप्त केलेले गोमांस अधिकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहे.
कत्तलखान्यातून जनावरांची सुटका: पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेली 12 जनावरे वेळेत धाड टाकून तस्करांच्या तावडीतून सुखरूप सोडवली. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली 3 वाहने घटनास्थळावरून जप्त केली.
अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी जरब: दुसऱ्या कारवाईच्या सत्रात पोलिसांनी छुप्या मार्गाने चालणारी विनापरवाना जनावरांची मोठी वाहतूक यशस्वीपणे पकडली. या कारवाईत पोलिसांनी 31,18,000 (एकतीस लाख अठरा हजार) रुपये किमतीचा प्रचंड मुद्देमाल जप्त केला.
यामध्ये वाहनांमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेली जाणारी 39 गोवंश जनावरे पोलिसांनी जप्त करून त्यांची सुरक्षितपणे मुक्तता केली व त्यांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळेत जमा केले आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 8 वाहने जागेवरच जप्त करण्यात आली.
आर.टी.ओ. (RTO) मार्फत गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी केवळ फौजदारी गुन्ह्यांवर न थांबता कडक प्रशासकीय पावले उचलली आहेत. या मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या सर्व 11 वाहनांचे परवाने (Permit) आणि संबंधित वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), छत्रपती संभाजीनगर यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.
एकूण जप्त मुद्देमाल
एकूण दाखल गुन्हे: 12 गुन्हे
एकूण आरोपी: 18 आरोपी
एकूण मुक्त केलेली जनावरे: 51 गोवंश जनावरे (12 कत्तलखान्यातून + 39 बेकायदेशीर वाहतुकीतून)
एकूण जप्त गोमांस: 865 किलो (किंमत रु. 6,75,000/-)
एकूण जप्त वाहने: 11 वाहने (3 गोमांस वाहतुकीतील + 8 जनावरांच्या वाहतुकीतील)
एकूण जप्त मुद्देमाल किंमत: तब्बल 37,93,000/- (अक्षरी सदतीस लाख त्र्याण्णव हजार) रुपये!
पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन:
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस जिल्हा हद्दीत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे. पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीरपणे गोवंश कटाई, गोमांस विक्री किंवा अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ पोलिसांच्या 'डायल 112' या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या जागृत नागरिकाची ओळख पूर्णपणे गु
प्त ठेवली जाईल.
What's Your Reaction?