चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांचे मनोमिलन, शुभेच्छा देत तोंडात भरवला पेडा
 
                                लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांची अंबादास दानवेंनी घेतली भेट...
लोकसभा उमेदवारी मिळल्याबद्दल दिल्या शुभेच्छा....
लोकसभेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावण्याचा केला निर्धार...
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची रविवारी मार्च रोजी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालाननगर येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल खैरे यांचे दानवे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. सत्कार करत खैरेंना पेढा भरवला. तसेच २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदार संघावार शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावण्याचा निर्धार केला.
संघटनेला सर्वस्व मानणारे आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असून उमेदवार घोषित होण्यापर्यंत आमच्या दोघात स्पर्धा असली तरीही आता पक्षाने उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची जिल्हाप्रमुख या नात्याने संपूर्ण माझी जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया यावेळी दानवे यांनी दिली.
लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा मी स्पष्टपणे व्यक्त केली होती. त्याला मी नाकारत नसून पक्षांतर्गत मागणी पर्यंतच ती मर्यादित असल्याचे दानवे म्हणाले. तसेच पद आणि निवडणूक सातत्याने येत असतात परंतु संघटना कायमस्वरूपी टिकून असते. तिच्या बळकटीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जसे देशभरात तळपत असून औरंगाबाद लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने येथील संघटनात्मक बांधणीसाठी आम्हीही असेच तळपणार असल्याची भावना यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
पक्ष टिकला तर नेते टिकतात, त्यामुळे मी पक्षाचे काम करणार असून पक्षाने चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी दिल्याने त्याचा प्रचार करणार असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसनेची ताकद मोठी असून आमचे संघटनात्मक काम सातत्याने सुरु असते. त्यामुळे निवडणुकीच्या प्राचाराला घाबरण्याचे काहीही कारण नसून जोमाने काम केले तर शिवसेनेचाच उमेदवार निवडणुन येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युतीमध्ये पक्ष फोडूनसुद्धा औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार नसल्याचा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. याप्रसंगी शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, माजी नगरसेवक सचिन खैरे, शहर संघटक सचिन तायडे व श्रीरंग आमटे पाटील उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            