जलपूजन करुन जायकवाडी धरणातून विसर्ग सुरु...
 
                                जलपूजन करुन जायकवाडी धरणातून विसर्ग सुरु...
गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करण्यासाठी सारे मिळून प्रयत्न करू-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31 (डि-24 न्यूज) –
गोदावरी खोरे हे सर्वात मोठे खोरे असून तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण सगळे मिळूनहे काम करू आणि गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करू, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पैठण येथील जायकवाडी प्रकल्प येथे केले.
जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे आज नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते जलपूजन करुन विसर्ग सुरु करण्यात आला. नाथसागर जलाशय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. हिकमतदादा उडान, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक, मुख्य अभियंता राजीव मुंदडा, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, शाखा अभियंता मंगेश शेलार, तहसिलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे आदी उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधतांना श्री. विखे पाटील म्हणाले की,स्व. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जायकवाडी प्रकल्प साकारला. यंदा निसर्गाची कृपा झाली आणि ह्याच महिन्यात पाणी भरलं. गोदावरी खोरे हे सर्वात मोठे असले तरी तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोऱ्यात आणायचे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. जल संपदा मंत्री म्हणून गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचे त्यांचे स्वप्न मी पुर्ण करणार.याद्वारे 65 टी एम सी पाणीइकडे वळवून आणता आले पाहिजे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे आवाहन श्री. विखे पाटील यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले की, संत ज्ञानेश्वर उद्यान 'पीपीपी मॉडेल' वर विकसित करणार. तेथे वॉटर स्पोर्ट, अत्याधुनिक संकल्पना विकसित करू. हा प्रकल्प इथल्या भागासाठी वरदान ठरेल. त्यामुळे
पर्यटन विकास होईल. संत एकनाथांच्या भूमीत संत ज्ञानेश्वर उद्यान करणे हे मोलाचे काम होय. याशिवाय 12 मेगा वॅट हायड्रो इले. प्रोजेक्ट, फ्लोटिंग सोलर प्रकल्प असे विविध प्रकल्पना चालना देण्यात आली आहे. तसेच ब्रह्म गव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी 150 कोटी दिले असून एक वर्षात ही योजना पुर्ण करणार. जलाशयांचे गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक आ. विलास भुमरे यांनी केले. त्यांनी जल प्रकलपाचे पाणी बंदिस्त पाईप लाईनद्वारे द्यावे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते करावे, ब्रह्म गव्हाण उपसा जलसिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी मांडली. सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
जायकवाडीशी निगडित बालपणीच्या आठवणीत रमले मंत्री विखे पाटील...
 
आपल्या आठवणींना उजाळा देत विखे पाटील म्हणाले की,मी या प्रकल्पाचा लहानपणापासून साक्षीदार आहे. येथून जवळ असलेले खिर्डी हे माझ्या बहिणीचं गाव. तो पाण्यासाठीचा संघर्षाचा काळ होता. मी लहान होतो. बहिणीकडे इथं पैठणला मी येत असे. आमच्या आजोबांचा अमृत महोत्सवी सत्कार याच धरणावर स्व. इंदिराजी यांच्या हस्ते झाला होता. मी कृषी महाविद्यालयात शिकत असतांना
सायकल वर धुळ्याहून इथं संत ज्ञानेश्वर उद्यान येथे आलो होतो, अशी ही आठवण श्री. विखे पाटील यांनी सांगितली.
जलसाठा आणि विसर्ग...
सध्या धरणात 90.13 टक्के पाणीसाठा आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी 1520.18 फुट आहे. धरणाचा एकूण जलसाठा 2694.776 दलघमी असून 1956.67 दलघमी जिवंत साठा आहे. धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या 18 दरवाजे अर्धाफुट उघडून 9432 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. सद्यस्थितीत धरणात 16230 क्युसेस इतकी पाण्याची आवक आहे. सध्या धरण तुडूंब भरले असून दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या छोट्या मोठ्या धरणांतून खालील प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. दारणा 2 हजार 486, नांदुर मधमेश्वर 9 हजार 465, वालदेवी 407, 2021
भावली 290, भाम 1 हजार 651, वाकी 276, कडवा 2 हजार 52, वाघाड 1 हजार 192, गंगापूर 1 हजार 235, गौतमी गोदावरी 262, पालखेड 738 व कश्यपी 480 क्युसेस.
काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
धरणातून होत असलेल्या पाणी विसर्गामुळे नदीच्या काठावरील गावांमध्ये नागरिकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            