टंचाई आढावा बैठक, गावनिहाय कृती आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

 0
टंचाई आढावा बैठक, गावनिहाय कृती आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

टंचाई आढावा बैठकःगावनिहाय कृती आराखडा...

तयार करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14 (डि-24 न्यूज)-दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतनिहाय सूक्ष्म नियोजन करून कृती आराखडा तातडीने सादर करावा. त्यात विहिरींचे अधिग्रहण, खोलीकरण, विंधन विहिरी आणि तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य द्यावे. अत्यावश्यक परिस्थितीतच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. टँकरच्या दैनंदिन संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापन करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज दिले.

 जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना व दुष्काळी परिस्थितीबाबत आज जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, पैठणच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार शिवानंद बिडवे आणि वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. 

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य...

 जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. प्रत्येक गावातील उपलब्ध जलस्रोत, पाण्याची मागणी आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार करावा. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पाईपलाइन, विहिरींचे अधिग्रहण व खोलीकरण यांसारख्या उपाययोजना प्राधान्याने राबवाव्यात.

जिल्ह्यात 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा...

बैठकीत माहिती देण्यात आली की, सध्या 97 गावे व 27 वाड्यांसाठी एकूण 170 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक 67, पैठण तालुक्यात 49, वैजापूर तालुक्यात 28, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 16 आणि फुलंब्री तालुक्यात 10 टँकर सुरू आहेत. ल्ह्यात एकूण 70 विहिरींचे अधिग्रहीत करण्यात आल्या असून, त्यापैकी 60 विहिरी टँकरसाठी तर 10 विहिरी टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष...

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. टँकरच्या फेऱ्या, पाणीपुरवठ्याचे प्रमाण, वेळापत्रक आणि वितरणाची नियमित तपासणी करावी. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दैनंदिन संनियंत्रण करावे. वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीकडे संबंधित तहसीलदारांनी विशेष लक्ष द्यावे. पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

संयुक्त पाहणीचे निर्देश...

 ते पुढे म्हणाले की, ग्राम महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस टंचाईग्रस्त गावांची संयुक्त पाहणी करावी. स्थानिक जलस्रोतांची उपलब्धता तपासून आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्या. टँकर सुरू करण्यापूर्वी सर्व पर्यायी उपाययोजनांची पडताळणी करावी.

पंचनामा अंतिम अहवाल लवकर सादर करा...

 शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नुकसानीच्या पंचनाम्यांचे अंतिम अहवाल निर्धारित निकषांनुसार तयार करावेत. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत ठेवून शासनाकडून प्राप्त याद्यांची पडताळणी करावी. मदत वितरणाच्या प्रक्रियेत विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा जी. सी यांनी दिले.

कायमस्वरुपी व्यवस्था निर्मितीवर भर...

 तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी नियमित समन्वय बैठका घेऊन पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्यावा. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow